मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट

0
167

माणदेश एक्सप्रेस/मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील भाजपा आणि महायुतीच्या विजयावर संशय व्यक्त केला होता. यानंतर भाजपा आणि मनसे या दोन पक्षात तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आता भाजपाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानावर गेल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या भेटीचे नेमके कारण काय? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या दोन नेत्यांच्या भेटीबद्दल भाष्य केले आहे.

 

“भेट झाली म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली, पण कधीकधी काही कामं असू शकतात, काही मैत्रीचे धागे असू शकतात. त्या माध्यमातून ही भेट होऊ शकते. या भेटीचा उद्देश हा काही राज ठाकरे यांच्याबरोबर युतीसाठी चर्चा करण्यासाठी गेले असे म्हणणं योग्य होणार नाही. जेव्हा इतक्या खुलेपणे देवेंद्र फडणवीस गेले याचा अर्थ इथे कोणताही राजकीय हेतू नाही हे समजून घ्यायचं,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंबंधी भेटीदरम्यान चर्चा झाल्याची शक्यता आहे का? याबद्दल मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला. “सांगता येणार नाही, कारण राज्याचे मुख्यमंत्री राज ठाकरे यांच्याकडे भेटायला गेले… पण मला व्यक्तिगतरित्या एक गोष्ट माहिती आहे की कोणत्याही राजकीय चर्चा करायच्या असतील तर इतक्या उघडपणे कोणी जाणार नाही. त्यासाठी राजकारणात गुप्त बैठका, भेटी होतात. त्यामधूनच हे सर्व प्रकरण पुढे जात असतं. इतक्या उघडपणे जाऊन युतीच्या चर्चा, पाठिंब्याच्या चर्चा कधीच होत नाहीत. मी प्रदेशाचा अध्यक्ष राहिलो आहे, नाशिकमध्ये जेव्हा आम्हाला एकत्र यायचं होचं तेव्हा मला जाणीव आहे की, आमच्या भेटी कधीच उघड झाल्या नाहीत,” असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here