
टीम इंडियाच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने मंगळवारी मुंबई रणजी संघाच्या ट्रेनिंग सेशनमध्ये सराव करण्याला पसंती दिली. हिटमॅन रोहित शर्मा सध्या फ्लॉप शोमुळे चर्चेत आहे. क्रिकेट कारकिर्द धोक्यात असताना यातून सावरण्यासाठी रोहित शर्मा मुंबई रणजी संघाच्या ताफ्यात घुसल्याचे दिसून आले.
३७ वर्षीय रोहित शर्मानं २०२४-२५ च्या हंगामातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील निराशाजनक कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. पाच डावांत ६.२० च्या सरासरीने फक्त ३१ धावा केल्यावर शेवटच्या कसोटी सामन्यात स्वत: बाहेर बसण्याचा निर्णय त्याला घ्यावा लागला. त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या. पण इतक्यात थांबणार नाही, हे त्याने स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमातील खास मुलाखतीतच स्पष्ट केले. टीम इंडियाकडून खेळताना आपला रुबाब पुन्हा दाखवण्यासाठी तो देशांतर्गत क्रिकेटमधील मुंबईच्या संघातील आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रॅक्टिस करताना दिसून आले.
रणजीच्या यंदाच्या हंगामात मुंबईचा संघ जम्मू काश्मिर विरुद्ध २३ जानेवारीला मैदानात उतरणार आहे. यासाठी मुंबईचा संघ वानखेडे स्टेडियमवर सराव करत आहे. स्टार स्पोर्ट्सनं रोहित शर्माचा रणजी संघातील खेळाडूंसोबत प्रॅक्टिस करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात रोहित शर्मा बॅटिंग करत असून नॉन स्ट्राइकवर अजिंक्य रहाणेची झलक पाहायला मिळते.