
माणदेश एक्सप्रेस/पुणे : जिल्ह्यात व्यवसाय, उद्योगवाढीसाठी अनुकूल वातावरण तयार केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध विभागांची परवानगी घेण्यासाठी एक खिडकी योजना लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
कायदा सुव्यवस्था चांगली असेल, तर उद्योजकांना विश्वास वाटतो. अधिकाधिक उद्योजक जिल्ह्यात यायला हवेत. उद्योजकांना त्रास देणारे, आर्थिक मागणी करणारे, खंडणीची मागणी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. याबाबत डुडी म्हणाले, जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या ११ विभागांची परवानगी घ्यावी लागते. यातील ७ विभाग हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येतात. या सर्व विभागांतील परवानग्या एकाच ठिकाणी मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे. या परवान्यासाठी लागणारे कागदपत्रे कमी असतील तर संबंधित व्यक्तीशी संपर्क करून पूर्तता केली जाणार आहे. पुढील महिन्याभरात ही प्रक्रिया सुरू होणार आहे.