पुण्यात झिकाची रूग्णसंख्या आतपर्यंत 52 वर; आणखी दोन संशयित रुग्णांचा मृत्यू

0
162

पुणे शहरात झिका व्हायरसचे (Zika Virus) रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत, रुग्णसंख्या 52 वर पोहोचली आहे. आतापर्यंत शहरातील झिकाचा संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या 4 जणांच्या मृत्यूंचे परीक्षण करणार आहे. त्यातून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पुणे महापालिका हद्दीतील आणखी दोन झिकाग्रस्त (Zika Virus) रुग्णांचा मृत्यू झाल्याच आढळून आले आहे. मृत्यूनंतर प्राप्त झालेल्या रुग्णांच्या नमुन्यांचा झिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मृत रुग्णांमध्ये कोथरूड मधील 68 वर्षीय, तर बाणेर येथील 78 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. यापूर्वी दोन ज्येष्ठांचा झिकामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यांना इतर व्याधी देखील असल्याने त्यांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास करण्यात येत आहे.

शहरात यापूर्वी दोन झिका (Zika Virus) संशयित मृतांची नोंद झालेली आहे. आता चारही संशयित मृत्यूंचे अहवाल पुनरावलोकनासाठी राज्य शासनाच्या समितीकडे पाठवण्यात आलेले आहेत. कोथरूड येथील रुग्णाचा 22 जुलै रोजी मृत्यू झाला होता. या रूग्णाला ताप आणि उलट्या अशी लक्षणे दिसून आली होती. त्यांच्या रक्ताचे नमुने 17 जुलैला एनआयव्हीकडे पाठवण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट 31 जुलै रोजी प्राप्त झाला त्यामध्ये हे रूग्ण झिका पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. मात्र, या वृध्दांच्या मृत्यूच्या कारणांमध्ये मल्टिपल ऑर्गन फेल्युअर आणि सेप्टिक शॉकचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

रुग्णाला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता, अशी देखील माहिती आहे. बाणेर येथील दुसऱ्या मृत व्यक्तीला 21 जुलैला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 26 जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला. 19 जुलैपासून या रूग्णाला ताप आणि अशक्तपणा यासारखी लक्षणे दिसून येत होती. त्याचे नमुने 21 जुलै रोजी एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. 30 जुलै रोजी रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. या रूग्णाच्या मृत्यूचे कारण श्वसनक्रिया बंद होणे, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाने ग्रस्त असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

खडकवासला, शिवणे भागात झिकाचे तीन रुग्ण
शिवणे व आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी झिका व्हायरसचे नवे तीन रुग्ण आढळले आहेत. झिकाचे रूग्ण (Zika Virus) आणखी वाढू नयेत यासाठी खडकवासला, सांगरुण व खेड शिवापूर या तीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने घरोघरी रुग्ण शोध मोहीम सुरू केली आहे. झिकाची लागण झालेल्या रुग्णांच्या कुटुंबातील आणि संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे, झिकाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here