पुणे पोर्श अपघातातील आरोपीच्या रक्ताची अदलाबदल ;आरोपीच्या आईनेच दिले रक्त

0
3

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहेत. या प्रकरणात अल्पवयीन आरोपी, त्याचे वडील आणि आजोबा सध्या अटकेत आहेत. पण या प्रकरणात आरोपीच्या आईचाही समावेश असल्याची बाब समोर आली आहे. १७ वर्षीय आरोपीच्या आईने मुलाचे रक्त नमुने बदलण्यासाठी स्वतःचे रक्त ससून रुग्णालयाला दिले असल्याचे पोलिसांमधील सूत्रांनी सांगितले आहे.

रक्त नमुने बदलण्यामध्ये डॉ. श्रीहरी हळनोरचा प्रमुख सहभाग होता. हळनोरनेच आईचेही रक्त नमुने घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, ज्यावेळी रक्त चाचणी घेण्यासाठी रक्त घेतले गेले, तेव्हा आरोपीच्या आई रुग्णालयात हजर होत्या. डॉ. अजय तावरे आणि डॉ. हळनोर यांच्या अटकेनंतर त्या बेपत्ता झाल्या आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पुण्यातील कल्याणी नगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघातप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नुमन्यामध्ये फेरफार झाल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जे.जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, डॉ. गजानन चव्हाण आणि छत्रपती संभाजी नगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांची समिती गठीत केली होती. या समितीने बुधवारी दुपारी आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे सादर केला. या अहवालात ससून रुग्णालयाचे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख व प्राध्यापक डॉ. अजय तावरे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्याविरोधात कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

बी.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात न घेता संस्थाप्रमुख म्हणून या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्याची शिफारस समितीने सादर केलेल्या अहवालात केली आहे.

सोमवारी (दि. २७ मे) डॉ. हळनोर आणि डॉ. तावरे यांना रक्त नमुने बदलल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीत डॉ. हळनोर यांनी अल्पवयीन आरोपीचे रक्त नमुने बदलले असल्याचे मान्य केले आहे. डॉ. तावरे यांच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला असल्याचे त्याने सांगितले.

ससून रुग्णालयाते अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी डॉ. अजय तावरे यांच्या नियुक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या पत्रानंतर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आंनी तावरे यांच्या नियुक्तीचे आदेश दिले होते. डॉ. तावरे यांच्यावर याआधी मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि अमली पदार्थ तस्करी या प्रकरणी आरोप आहेत. तरी त्यांची न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here