आटपाडी नगरपंचायतचा भोंगळ कारभार : पाण्यासाठी नागरिकांना आठ दिवस पहावी लागतेय वाट 

0
33

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रुपांतर झाले असले तरी, नागरिकांच्या मूलभूत प्रश्न अजून सुटले नाहीत. विद्यानगर परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल आठ दिवस वाट पहावी लागत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

आटपाडी शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आटपाडी तलावातून पाणी पुरवठा योजना आहे. आटपाडी तलावाच्या क्षेत्रामध्ये झालेल्या पावसाने व टेंभू योजनेतून तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामूळे पिण्याचे पाणी शहरातील प्रत्येक भागात तीन दिवसातून मिळालेच पाहिजे. परंतु नगरपंचायतला सध्या पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने पाणी पुरवठा कर्मचारी यांचा मेळ नाही.

ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रुपांतर झाल्यावर, प्रशासक म्हणून तत्कालीन तहसीलदार यांनी चार्ज घेतल्यानंतर त्यांनी पिण्याचे पाणी व स्वच्छता याकडे लक्ष दिले होतें. त्यावेळी आटपाडीतील नागरिकांना तीन दिवसातून पिण्याचे पाणी मिळत होते. परंतु या ठिकाणी मुख्याधिकारी यांची नियुक्ती झाल्यावर कारभार सुधारण्याची आवश्यकता असताना फक्त आलेल्या निधीसाठी ठेकेदार पोसण्यासाठीच मुख्याधिकारी यांची नेमणूक झाली असल्याचे चित्र तयार झाले होते.

खरे तर नगरपंचायतच्या माध्यमातून नागरिकांना मूलभूत गरजा पूर्ण करणे अपेक्षित असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून, शासना कडून आलेल्या विकास निधी खर्च करण्यासाठी मात्र नगरपंचायत तत्परता दाखवत असून, आटपाडी नगरपंचायत फक्त ठेकेदार जागवण्यासाठी असल्याची नागरिकांना मधून चर्चा असून, पिण्याच्या पाण्यासाठी नगरंचायतीने तत्परता दाखवावी अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.