“आमची मुलगी तर गेली पण आता तिच्याबद्दल…” पुणे अपघातातील मुलीच्या आईची विनंती

0
1

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्री अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत कार चालवत बाईकला धडक दिली आणि त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण तापलेलं असून त्या अलपवयीन मुलाची सध्या बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. मात्र या अपघातात मृत्यू झालेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्था या दोघांच्या कुटुंबियांवर मात्र दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अश्विनी उर्फ आशी कोस्था हिच्या दुर्दैवी मृत्यूनंतर २१ मे रोजी जबलपूर येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मात्र त्यांच्या मृत्यूनंतर अनीश आणि अश्विनी यांच्या नात्याबाबत उलटसुलट चर्चा होत असून अश्विनीच्या जाण्यामुळो कोलमडून गेलेल्या तिच्या आईने मात्र या गोष्टीवर आक्षेप नोंदवला आहे. एकाच ठिकाणी काम करणारे प्रत्येक मुलगा-मुलगी हे कपल किंवा जोडीदार नसतात. आमची मुलगी तर गेली पण आता तिच्याबद्दल मीडियाने असे शब्द वापरू नयेत, अशी विनंती तिच्या आईने केली आहे.

अश्विनीच्या या अपघाती मृत्यूमुळे तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, त्यांनी आपल्या तरण्याताठ्या मुलीला अखेरचा निरोप तर दिला पण त्यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नाहीयेत. लाडकी लेक या जगातून गेली, यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीये. घटनेनंतर 20 मे रोजी रात्री उशीरा अश्विनीचा मृतदेह जबलपूर येथे आणण्यात आला. त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अश्विनी ही कुटुंबात सर्वात लहान असून प्रेमाने तिला सगळेजण आशी म्हणायचे. तिच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

पुण्यात करायची नोकरी

मूळची जबलपूरमध्ये राहणाऱ्या अश्विनीचे वडील कोष्टा वीज विभागात सहायक पदावर कार्यरत आहेत. त्यांची लेक अश्विनी हिने पुण्यात शिक्षण घेतलं त्यानंतर गेल्या 2 वर्षांपासून ती पुण्यातच नोकरी कर होती. त्यापूर्वी ती ॲमेझॉनमध्ये काम करायची. हा अपघात घडला तेव्हा अश्विनी ही तिचा सहकारी अनीश अवधिया याच्यासोबत डिनरनंतर बाईकवरून घरी जात होती.

घटनास्थळीच झाला मृत्यू

मात्र मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या गाडीने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. कोट्यवधींची पोर्शे कार घेऊन तो मुलगा भरधान वेगाने जात होता. या अपघातात अश्विनी आणि अनीश यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली. सध्या त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. बाल सुधारणगृहात ठेवण्याचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने दिला आहे. आरोपी अल्पवयीन आहे. त्याला प्रौढ ठरवून खटला चालवावा अशी मागणी होत आहे. कारण प्रौढ ठरवून खटला चालवल्यास त्याला अधिक कठोर शिक्षा होऊ शकते. पण आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला कायद्यातील तरतुदींच्या आधारे काही लाभ मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here