आता खानापूरचे आमदार ब्रम्हानंद पडळकरच…! तालुक्यातील जनतेचं ठरलंय : सर्व गावांचा लवकरच दौरा करणार : जयवंत सरगर

0
59

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून जनतेने आता ब्रम्हानंद पडळकर यांना पसंती दिली असून आटपाडी तालुक्यातील सर्व गावांचा दौरा लवकर सुरू करणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष जयवंत सरगर यांनी दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, तालुक्यातील जनतेने आता बदल करण्याचे ठरवले आहे. खानापूरचे आमदार म्हणून ब्रम्हानंद पडळकर हेच जनतेला हवे आहेत. विकासाला साथ व कार्यकर्त्यांच्या वेळेला धावणारे नेते म्हणून ब्रम्हानंद पडळकर ओळखले जातात. भाजपचे स्टार प्रचारक विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुरुवातीपासून राजकारण करत असताना गावगाड्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका घेऊन समाजकारण केले आहे.

सत्ताधाऱ्या विरुद्ध राजकीय संघर्ष करून जनतेच्या पायाशी सत्ता नेण्याचे दिव्य स्वप्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी बाळगले आहे. ब्रम्हानंद पडळकर यांना कोणताही राजकीय अनुभव नसताना जिल्हा परिषदेला प्रथम संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे नेतृत्व केले. समाज कल्याण विभागाचे सभापती असताना संपूर्ण सांगली जिल्ह्यात समाज कल्याण विभागाचा वेगळा ठसा उठवला. त्याच माध्यमातून त्यांची जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेशी नाळ घट्ट झाली आहे.

गेल्या 25 वर्षांमध्ये आटपाडी तालुक्याच्या व खानापूर तालुक्यावर काही ठराविक घराण्यांनीच वर्चस्व ठेवले होते. त्या वर्चस्वला आता सुरुंग लावण्यासाठीच आटपाडी तालुक्यातील जनतेने आता, ‘आमचं ठरलंय ब्रमानंदच आमदार’ अशी हाक दिली आहे. यासाठीच आटपाडी तालुक्यातील करगणी, आटपाडी, खरसुंडी, दिघंची या चार जिल्हा परिषद गटामध्ये असणाऱ्या पंचायत समिती गणातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांच्या भावना व सर्वसामान्य जनतेपर्यंत जात आमची भूमिका त्यांच्यासमोर ठेवणार आहे.
राजकारण करत असताना ते सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी असावे, कोणाची आडवा आडवी किंवा जिरवा जिरवी हा विषय कधीच पडळकर बंधूंनी घेतला नाही. फक्त विकासात्मक राजकारण करण्यावर भर देत पडळकर बंधूंनी शेकडो कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. आज आटपाडी तालुक्यातून बदल घडवण्यासाठी मोठा उठाव होत आहे. कार्यकर्त्यातून व सर्व सामान्य जनतेतून ब्रम्हानंद पडळकर यांनी निवडणूक लढवण्याची मोठी मागणी होत आहे.

सर्वसामान्य जनतेवर होत असणारा अन्याय, हेवेदावे याला जनता कंटाळली आहे. आम्ही आता आटपाडी तालुक्यातील सर्व गावामध्ये जावुन सर्व सामान्य जनतेची भेट घेणार आहोत. त्यांच्याशी हितगूज साधणार आहे. जनतेच्या अपेक्षा व त्या पूर्ण करण्यासाठी पडळकर सैनिक आता कामाला लागला आहे. काहीही झाले तरी आता खानापूर विधानसभेला ब्रम्हानंद पडळकर यांनाच आमदार करणार असल्याचेही जयवंत सरगर म्हणाले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here