सोन्याच्या स्थिरावलेल्या दरात पुन्हा वाढ! जाणून घ्या आजचे सोन्याचे दर

0
151

गेल्या महिन्याभरापासून सोन्याचे दर हे 72 हजार रुपयांच्या वर स्थिरावले होते. मात्र गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात दहा ग्रॅम शुद्ध सोन्याच्या साठी 1500 रुपयांची वाढ होऊन सोन्याचे दर हे जीएसटी (GST) शिवाय 73 हजार 500 रूपयांवर जाऊन पोहोचले आहेत. जागतिक पातळीवर फेडरल बँक्यांचे व्याजदर कमी झाल्याने गुंतवणूकदार हे सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळले असल्यानं, सोन्याच्या मागणीत वाढ होऊन सोन्याचे दर वाढले असल्याचं मानल जात आहे. सोन्याच्या वाढलेल्या या दराचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर देखील होतांना दिसत आहे.

महिन्याभराच्या विश्रांतीनंतर सोन्याच्या दाराला पुन्हा झळाळी!
गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला सातत्याने झळाळी मिळालीय. गेल्या सात महिन्यात सोन्याच्या दराने उच्चांक गाठलाय. दरम्यान हल्ली सोन्याचा दर प्रतितोळा 73 हजार 500 रूपयांवर गेलाय. जागतिक पातळीवर फेडरल बँक्यांचे व्याजदर कमी झाल्याने गुंतवणूकदार हे सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळले आहे. परिणामी, त्याचा परिणाम हा सोन्याच्या किंमतीवर झालाय. व्याजदरात कपात होण्याच्या आशेनं अमेरिकन वायदे बाजारात हा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालाय. ग्राहकांच्या मते सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांची वाढ झाल्याने अपेक्षित असलेली सोने खरेदी आता करता आली नाही, त्यामुळे कमी प्रमाणत सोने खरेदी करावे लागत असल्याचं एका ग्राहकांचे म्हणणे आहे. तर आज सुवर्णनगरी जळगाव शहरात सोन्याचे दर हे जीएसटी (GST) शिवाय 73 हजार 500 रूपयांवर जाऊन पोहोचले आहेत.

बँकाची अधिक सोने खरेदी करुन साठा करण्यावर भर
दरम्यान, पुढच्या काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. कारण जगभरातील 81 टक्के केंद्रीय बँका (Central Banks) पुढील 12 महिन्यांत आणखी सोन्याची खरेदी करणार असल्याचा अंदाज आहे. जागतिक सुवर्ण परिषदेनं याबाबतचा अहवाल दिला आहे. या सर्वेक्षणात 70 केंद्रीय बँकांचे प्रतिसाद प्राप्त झाले आहेत, ज्यामध्ये 29 टक्के मध्यवर्ती बँकांनी पुढील 12 महिन्यांत अधिक सोने खरेदी करून सोन्याचा साठा वाढवणार असल्याचे सांगितले.

2018 मध्ये सुरू झालेल्या या सर्वेक्षणानंतरची ही दुसरी उच्च पातळी आहे, जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात केंद्रीय बँका सोन्याचा साठा वाढविण्याबाबत बोलत आहेत. केंद्रीय बँकांकडून सोन्याच्या नियोजित खरेदीची कारणे पाहिल्यास, देशांतर्गत सोन्याचे उत्पादन, उच्च जोखीम आणि वाढती महागाई याविषयी वित्तीय बाजारांची चिंता लक्षात घेऊन केंद्रीय बँका धोरणात्मकरीत्या त्यांचे सोने होल्डिंग वाढवत आहेत.

सोने खरेदीत RBI चा जगातील पहिल्या पाच मध्यवर्ती बँकांमध्ये समावेश
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 69 मध्यवर्ती बँकांपैकी 81 टक्के बँकांनी सांगिलतले की, सोन्याच्या साठ्यात वाढ होईल, तर 19 टक्के बँकांनी त्यात कोणताही बदल होणार नसल्याचे सांगितले. 71 टक्के केंद्रीय बँकांनी 2023 मध्ये सोन्याचा साठा वाढविण्याबाबत बोलले होते. तर 69 टक्के केंद्रीय बँकांनी सांगितले की, एकूण परकीय चलनाच्या साठ्यात सोन्याचा वाटा पुढील पाच वर्षांत वाढेल. सोने खरेदीच्या बाबतीत, RBI चा जगातील पहिल्या पाच मध्यवर्ती बँकांमध्ये समावेश आहे.