“मनसे ‘हा’ पाकिस्तानी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही”-राज ठाकरे 

0
230

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विरोध करण्यात येत आहे. फवादचा ‘लिजेंड ऑफ मौला जट’ चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावर चित्रपटाचा विरोध केला आहे आणि ट्वीट करुन इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी ट्वीटमध्ये म्हटलंय, कलेला सीमा नसतात, पण पाकच्या बाबतीत हे अमान्य आहे.

पाकिस्तानी अभिनेत्याच्या चित्रपटाला मनसेचा विरोध
इतर राज्यांच्या सरकारांनीही हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. या चित्रपटावरुन राज ठाकरेंनी चित्रपटगृहाच्या मालकांनीही इशारा दिला आहे. थिएटर मालकांनीही चित्रपट दाखवयाच्या भानगडीत पडू नये, असं राज ठाकरेंनी म्हटलंय. नवरात्रीदरम्यान मला कुठलाही संघर्ष नको, सरकारनं चित्रपट प्रदर्शित होणार नाही ते पाहावं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी ट्वीटमध्ये नेमकं काय लिहिलंय?
फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, ‘लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात?

आणि कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे, पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही. हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरु आहे? महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे.

अर्थात बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही, हे नक्की.

या आधी असे प्रसंग जेंव्हा आले होते तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे थिएटर मालकांना सध्या तरी नम्रपणे आवाहन आहे की उगाच सिनेमा प्रदर्शित करण्याच्या भानगडीत पडू नका.

हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरु होणार आहे. अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही. आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार. आणि उगाच संघर्ष आम्हाला पण नको आहे.

त्यामुळे वेळीच पाऊलं उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पहावं. मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या, तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये.

कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे.

फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, ‘लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात?…

पहा पोस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here