विधानसभेसाठी मनसेकडून आत्तापर्यंत एकूण 6 उमेदवारांची घोषणा

0
169

विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यात आणखी दोन उमदेवारांच्या नावाची घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मराठावाडा दौरा केल्यानंतर राज ठाकरेंचा विदर्भ दौरा सुरू असून आज ते गडचिरोली जिल्ह्यात आहेत. भंडारा, गोंदिया जिल्ह्यातून राज ठाकरेंनी गडचिरोली जिल्ह्यातील साकोली येथील मनसैनिक व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर, चंद्रपूर येथील बैठकीत राज ठाकरेंनी मनसेच्या आणखी दोन उमेदवारांची घोषणा केली. त्यामुळे, विधानसभेसाठी मनसेकडून आत्तापर्यंत एकूण 6 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून राज ठाकरेंनी उमेदवारांच्या बाबतीच षटकार ठोकला आहे.

चंद्रपूर येथील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी चंद्रपूर (Chandrapur) आणि राजुरा विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यामध्ये, चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे आणि राजुरा विधानसभा मतदारसंघातून (Vidhansabha Election) सचिन भोयर यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, यापूर्वी मराठावाडा दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी 4 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर, विदर्भ दौऱ्यात 2 उमेदवारांची घोषणा झाल्याने मनसेनं (MNS) विधानसभेचा षटकार ठोकल्याचं दिसून येत आहे. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांत आघाडी घेत मनसेचे 6 उमेदवारी जाहीर केल्यामुळे त्यांनी एकला चलो रेची भूमिका घेतल्याचेही स्पष्ट होत आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्याची सुरुवात सोलापूरमधून केली होती. सोलापूरमध्ये मुक्काम केल्यानंतर त्यांनी धाराशिव ते हिंगोली असा मराठवाडा दौरा केला. या दौऱ्यात सोलापूरमधूनच त्यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह दिलीप धोत्रे या दोन उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामध्ये, मुंबईतील शिवडीमधून बाळा नांदगावकर आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी दिलीप धोत्रे यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर, लातूर येथून आणखी एका उमेदवारांची घोषणा करण्यात आली. लातूर ग्रामीणसाठी संतोष नागरगोजे यांना मनसेचं तिकीट देण्यात आलं आहे. तर, हिंगोली दौऱ्यावर असताना हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी बंडू कुटे यांना राज ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली होती. यावेळी, कुटे यांच्या खांद्यावर हात ठेऊन, आता तुम्हीच यांच्याकडे लक्ष द्या, असे आवाहनही मनसैनिकांना केलं होतं.

राज ठाकरेंनी घोषित केलेले मनसेचे 6 उमेदवार
1. बाळा नांदगावकर – शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे – पंढरपूर
3. लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा – बंडू कुटे
5. चंद्रपूर – मनदीप रोडे
6. राजुरा – सचिन भोयर

उमेदवारी जाहीर करताच मनसैनिकांत राडा
चंद्रपुरात राज ठाकरेंची बैठक संपताच मनसेच्या दोन गटात हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरे यांनी विदर्भात जाहीर केलेल्या 2 उमेदवारांपैकी राजूरा मतदारसंघातून सचिन भोयर यांना देण्यात आलेल्या उमेदवारीला विरोध करत भोयर समर्थक आणि चंद्रप्रकाश बोरकर समर्थकांमध्ये ही हाणामारी झाल्याची माहिती आहे. चंद्रप्रकाश बोरकर हे मनसेचे चंद्रपूर जिल्हा सचिव असून त्यांच्या कार्यकर्त्यांचा सचिन भोयर यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध होता, आणि त्या मुद्द्यावरूनच दोन गटांमध्ये आधी शाब्दिक वादावादी झाली आणि नंतर प्रकरण धक्काबुक्की आणि एकमेकांना मारण्यापर्यंत गेल्याचं पाहायला मिळालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here