
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच आटपाडीचे अध्यक्ष तथा आरपीआयचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, दि. २ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता पंचायत समिती सभागृह, आटपाडी येथे “गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण-गौरव सोहळा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये दहावी व बारावी परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने यश मिळवलेल्या तसेच नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सार्वजनिक सन्मान करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी हा सोहळा उपयुक्त ठरणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून तहसीलदार सागर ढवळे, प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र खरात, नगरपंचायतचे मुख्याधिकारी वैभव हजारे, पोलिस निरीक्षक विनय बहिर, गटशिक्षणाधिकारी जगन्नाथ कोळपे तसेच महावितरणचे मुख्य अभियंता संजय बालटे हे उपस्थित राहणार आहेत.
तर प्रमुख पाहुणे म्हणून सातारा येथील उद्योजक तात्यासाहेब गायकवाड आणि श्रीकांत देवकर यांची उपस्थिती लाभणार आहे. फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच आटपाडी (जि. सांगली) यांच्या वतीने सदरचा कार्यक्रम होणार असून, सामाजिक जाणिवा जागवण्यासाठी आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे आयोजन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.