मराठा समाजाला सगेसोयरे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे यांनी 8 जूनला आमरण उपोषण सुरु केले होते. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. मात्र, त्यांची प्रकृती लक्षणीयरित्या खालावल्याचे समोर आले आहे. अंतरवाली सराटीत येथे डॉक्टरांचे एक पथक तैनात आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी कोणतेही उपचार घेण्यास नकार दिला आहे. यापूर्वी आमरण उपोषण करताना मनोज जरांगे पाटील यांना काहीवेळा सलाईन लावण्यात आली होती. परंतु, सध्या मनोज जरांगे पाटील कोणतेही उपचार घेण्यासाठी तयार नाहीत.
या पार्श्वभूमीवर अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक, आणि आरोग्य अधिकारी यांनी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला. मात्र जरांगे यांनी उपचार घेणार नसल्याचं स्पष्ट केले. दरम्यान मनोज जरांगे यांना उपचाराची आवश्यकता आहे त्यांची प्रकृती खालावत असून .मनोज जरांगे यांच्या मागण्या, त्यांची उपोषणानंतर प्रकृतीची माहिती आम्ही शासनाला कळवलेली आहे, अशी माहिती तहसीलदारांनी दिली.
डॉक्टरांनी काय सांगितले?
डॉक्टरांनी काहीवेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी केली. त्यानंतर डॉक्टरांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आज सकाळपासून मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या शरीरातील रक्तदाब खालावला आहे. उपोषणाचा चौथा दिवस असल्याने त्यांच्या रक्तातील साखरेची पातळीही खालावली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना शक्य तितक्या लवकर उपचारांची गरज आहे. अशी माहिती जालन्याच्या आरोग्य जिल्हाधिकारी जयश्री भुसारे यांनी दिली.