
माणदेश एक्सप्रेस/पुणे: राज्यामधील थंडी वाढल्याने गारठा चांगलाच जाणवू लागला आहे. किमान तापमान घटले असून, राज्यात नगरला सर्वांत कमी किमान तापमान १०.५ अंश सेल्सिअस आहे, तर पुण्यात १२ अंशावर पारा होता. त्यामुळे पुणेकर गारठले आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये गारठा कमी होण्याची शक्यता आहे, तर काही भागांत ढगाळ वातावरण राहील.
सध्या उत्तर भारतामधील थंडीत चढ-उतार कायम आहे, तर राज्यात किमान तापमानात घट झाली आहे, पण मंगळवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी कमी होण्याचा अंदाज आहे. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पश्चिमी चक्रवातांच्या तीव्रतेनुसार थंडी सातत्याने कमी-अधिक होत आहे. उत्तर भारतातील तापमानात चढ-उतार राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीही कमी-अधिक होण्याची शक्यता आहे.
राज्यातही किमान तापमानात चढ-उतार कायम पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात गारठा काहीसा वाढला होता. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तापमान १० अंशाच्या खाली गेले. पुण्यातही थंडी जाणवू लागली आहे. सकाळी आणि सायंकाळनंतर हवेत गारठा आहे. दुपारी मात्र उन्हाचा चटका काही प्रमाणात अनुभवायला मिळत आहे.
राज्यातील किमान तापमान
पुणे : १२.७, नगर : १०.५, जळगाव : १२.७, कोल्हापूर : १८.३, महाबळेश्वर : १४.६, नाशिक : १२.३, सोलापूर : १५.९, मुंबई : २१.०, परभणी : १२.४, नागपूर : १२.२, यवतमाळ : १२.२