“महाराष्ट्राची कशी ओळख होऊ देणार? हे आपण ठरवा. मी तर म्हणेण”…, – उद्धव ठाकरे यांचा सवाल

0
49

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज ठाकरे गटाचा संभाजीनगरमध्ये जाहीर मेळावा पार पडला. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमदेवार चंद्रकांत खैरे यांचा संभाजीनगर मतदारसंघातून पराभव झाला. हा पराभव उद्धव ठाकरे यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यांनी संभाजीनगरच्या पराभवाचा मुद्दा उपस्थित करत काही महत्त्वाचे सवाल आपल्या कार्यकर्त्यांसमोर आणि नागरिकांसमोर केले. “काय झालं कसं झालं? याचा विचार केला गेलाच पाहिजे. कारण आता तीन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. कालची जी लढाई होती ती आपल्या देशाची, संविधानाची लढाई होती. विधानसभेची निवडणूक येणार आहे. ही महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई आहे. या महाराष्ट्राची ओळख जगामध्ये काय लिहिली गेली पाहिजे? ते ठरवणारं ही निवडणूक आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“महाराष्ट्र हा साधूसंतांचा, शिवप्रभूंचा, मर्दांचा ही ओळख अशीच ठेवणार की, लाचार, गद्दार आणि हरामखोरांचा महाराष्ट्र अशी ओळख होऊ देणार? हे आपण ठरवा. मी तर म्हणेण, मी लाचारी, गद्दारी आणि हरामखोरांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही. प्राणपणाने लढेन. पण माझ्या शिवरायांच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही ही शपथ घेऊन मी मैदानात उतरलेलो आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचा शिंदे सरकारवर घणाघात
“विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मी म्हटलं होतं की, हे गळती सरकार आहे. या गळती सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन आहे. हे शेवटचं अधिवेशन आहे. यानंतर निवडणुका आल्यानंतर हे जुमलेबाज सरकार पुन्हा गादीवर दिसणार नाही, अशी शपथ घेऊन आपण मैदानात उतरलो पाहिजे”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. “योजना खूप मांडल्या जात आहेत. खास करुन माता-भगिणींना आपल्याकडे आकर्षित कसं केलं जाईल, यासाठी ते डाव आखून ते मतदान आणि निवडणुकीला सामोरं जात आहेत”, असंदेखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“गेली १० वर्षे मोदी सरकार तिकडे सत्तेमध्ये आहे. माझा साधा प्रश्न आहे, दहा वर्षात ज्या योजना घोषित केल्या त्यापैकी किती अंमलात आणल्या? जेव्हा शेतकऱ्यांची वीजबिल माफीची घोषणा केली, माझं आजही जाहीर मागणं आहे, फक्त वीजबिल माफ करु नका. तर शेतकऱ्यांची संपूर्ण थकबाकी माफ करा आणि वीजबिल माफ करा. अन्यथा जाहीर करा की, तुम्ही थकबाकी वसूल करणार आहात”, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी केलं.

“काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केलं होतं की, आमचं सरकार आल्यानंतर आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं वीजबिल माफ करु. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात लाट उसळली. सुशीलकुमार शिंदे यांनी काय केलं? ताबोडतोब वीजबिल माफीचा निर्णय घेतला. ऐन निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना शून्य रकमेची बिलं गेली. निवडणुका झाल्या. शिवसेनेचा पराभव झाला आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं. सुशीलकुमार शिंदे यांना पदावरुन पायउतार व्हावं लागलं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. यानंतर शून्य रकमेची वीजबिलं निवडणुकीनंतर दुप्पट दराने आली हा तुमचा अनुभव आहे की नाही? हे तुम्ही मला सांगा”, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here