डोंबिवलीत एमआयडीसी फेज-२मधील एका कंपनीत मोठा स्फोट

0
61

डोंबिवली परिसरातील एमआयडीसी भागात पुन्हा एकदा मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामुळे डोंबिवली पुन्हा हादरली आहे. एमआयडीसी फेज-२मधील एका कंपनीत मोठा स्फोट झाला. यानंतर तिथे भीषण आग लागली आहे. यामुळे परिसरात धुराचे लोळ पसरले आहेत. सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

कापड प्रिटींगसाठी लागणाऱ्या केमिकल कंपनीला आग
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात असलेल्या फेज 2 मध्ये भीषण आग लागली आहे. एमआयडीसी परिसरात असलेल्या न्यू अॅग्रो केमिकल या कंपनीला ही आग लागली आहे. या कंपनीत कापड प्रिटींगसाठी लागणारे केमिकल बनवण्याचे काम केले जाते.

सुदैवाने जीवितहानी नाही
रविवारी ७ जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमारास या कंपनीत अचानक आग लागली. त्यानंतर काही मिनिटातच ही आग सर्वत्र पसरली. प्राथमिक माहितीनुसार, इलेक्ट्रिक पार्किंगमुळे भीषण आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ज्या ठिकाणी आग लागली, त्या ठिकाणी ६ कामगार काम करत होते. सुदैवाने ते सुखरुप बाहेर पडले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

यापूर्वीच्या घटनेत 12 जणांचा मृत्यू
दरम्यान याआधीही डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला होता. तर काही लोक अजूनही बेपत्ता असल्याची महिती समोर आली होते. या घटनेत जखमी झालेल्यांची संख्याही जास्त होती. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी कंपनीचे मालक आणि व्यवस्थापक यांच्या विरोधात 304 ए कलमानुसार गुन्हा दाखल केला होता.

त्यासोबतच गेल्या महिन्यात डोंबिवली एमआयडीसीतील इंडो अमाईन्स या किटकनाशक बनवणाऱ्या रासायनिक कंपनीत स्फोट झाला होता. आग लागताच इंडो अमाईन्स कंपनीसह लगतच्या मालदे कॅपीसिटर्स कंपनीमधील कर्मचारी तात्काळ कंपनी बाहेर आल्याने मोठी जीवित हानी टळली. दोन्ही कंपन्यांचे आगीत मोठे नुकसान झाले होते.

आगीच्या घटना कधी आटोक्यात येणार?
दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवली एमआयडीसी भागात असलेल्या केमिकल कंपनीत आग लागल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच आजूबाजूला असलेल्या नागरिक वस्त्यांमध्ये घबराट पसरली आहे. डोंबिवलीत सातत्याने लागणाऱ्या आगीच्या घटना कधी आटोक्यात येणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.