विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातील शासनाच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. आंबेगाव येथील आदिवासी निवासी इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारामध्ये जिवंत अळ्या आढळल्या आहेत. विद्यार्थ्यांना सकाळी नाश्त्यामध्ये दूध देण्यात येतं. या दुधामध्ये जिवंत अळ्या सापडल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. मागील दोन महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये जिवंत अळ्या आढळल्या होत्या. त्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या दुधामध्ये जिवंत अळ्या सापडल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. या आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचं समोर आलंय.
मुलांच्या जिवाशी खेळ सुरू असल्यानं आता संताप व्यक्त केला जात (Larvae Found In Student Milk) आहे.
दुधात अळ्या सापडल्याचा व्हिडिओ (Video Viral) व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये आपण पाहु शकता, की दुधात अळ्या तरंगताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात आतापर्यंत अनेक प्रकारचे प्राणी आढळले होते. कधी मेलेली चिमणी, मेलेले बेडूक तर कधी मेलेले साप तर आता चक्क दुधात जिवंत अळ्या सापडल्या आहेत. असे अन्न जर विद्यार्थ्यांनी खाल्लं, तर निश्चितच त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचणार आहेत. विद्यार्थ्यांना त्रास झाल्यास जबाबदार कोण असणार, हा सवाल निर्माण होत आहे.
विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातील प्रकल्पाअंतर्गत जितक्या आश्रमशाळा येतात, त्या सर्व शाळांना हे दूध वितरीत केलं जातं. दुधाच्या जुन्या पाकिटांमध्ये अळ्या होत्या, नवीन पाकिटं उघडून पाहिलं असता त्यात देखील अळ्या आढळल्या, अशी माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही पाकिटं पुणे आणि नाशिकच्या वरिष्ठ कार्यालयांमध्ये पाठवण्यात येणार आहे. याप्रकरणी सखोल चौकशी केली जाणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.