कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण ; माजी खासदारांनी मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप

0
1175

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : कवठेमहांकाळचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना घरात घुसून मारहाण केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर, खासदार संजय पाटील यांनी आधी आपल्या स्वीय सहायकाला मारहाण केली असल्याचे सांगत, याचा जाब विचारायला गेले असताना आपल्या कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण केल्याचे संजयकाकांनी मान्य केले. मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आमदार सुमनताई पाटील व रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडला.

 

कवठेमहांकाळ येथील राष्ट्रवादीचे नेते माजी उपनगराध्यक्ष मुल्ला यांना माजी खासदार पाटील व त्यांच्या समर्थकांनी घरात घुसून मारहाण केली असून, यावेळी मुल्ला यांना वाचवायला आलेल्या त्यांच्या 76 वर्षीय आईलाही स्वत: खासदारांनी ढकलून दिले असा आरोप राष्ट्रवादी गटाकडून करण्यात आला आहे.

 

याबबात अधिक माहिती अशी, आज सकाळी साडेसातच्या सुमारास अय्याज मुल्ला हे घरासमोर बसले होते. यावेळी संजयकाका पाटील यांचे पीए खंडू होवळे हे मुल्ला यांच्या घरी आले. संजय काका भेटायला येणार असल्याचे सांगितले. तोपर्यंत दारात दोन-तीन गाडी येऊन थांबल्या. गाड्यांमधून माजी खासदार पाटील यांच्यासह दहा-पंधरा जण उतरले. त्यांनी थेट घरात घुसून मुल्ला यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यांना वाचवायला आलेले त्यांच्या घरातील महिला व मुलांनाही शिवीगाळ करत जबर मारहाण केली.

 

दरम्यान माजी खासदार पाटील यांनी सांगितले, गुरूवारी रात्री माझे स्वीय सहायक खंडू होवाळे यांना नगरपालिकेच्या निवडणुकीवरून मुल्ला, बाळासाहेब पाटील व पिंटू कोळेकर तिघांनी मारहाण केली. याची विचारणा करण्यासाठी सकाळी गेलो असता अरेरावीची व ताणून मारण्याची भाषा वापरली. यावेळी माझ्या एका कार्यकर्त्यांने दोन थोबाडीत मारल्या. आम्हीही या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु या प्रकरणामुळे सध्या कवठेमहांकाळमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. (स्रोत : एबीपीमाझा)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here