अतिरेकी उष्माघातामुळे मानवी आरोग्यावर विविध परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ: भरपूर घाम येणे, शरीरातील पाणी कमी होणे, तहान लागणे, भूक कमी लागणे, खूप थकवा येणे, शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येणे, हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब वाढणे, स्नायूंमध्ये थकवा जाणवणे, डोकेदुखी जाणवणे.
पन्हं
उन्हाळ्यात शरीरात जीवनसत्त्व क भरपूर प्रमाणात असल्यास उत्तम परिणाम मिळतात. उन्हाळ्यात कच्ची कैरी, आलं आणि पाणी यांचे मिश्रण करून पन्हं तयार केले जातं. उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचे पन्हं शरीरासाठी अत्यंत गुणकारी ठरतं. उन्हाळ्यात घामाच्या धारा कमी करण्यासाठी पन्हं अत्यंत उपायकारक ठरतं.
आवळा रस किंवा सरबत
उन्ह्याळ्यात शरीरात क्षारांचे प्रमाण राखण्यासाठी आवळा वाळवून त्यात मीठ साखरेचे आवश्यक प्रमाण एकत्र करून केलेलं सरबत उन्हाळ्यात अत्यंत गुणकारी ठरतं. स्वादुपिंडाच्या आरोग्यासाठीदेखील आवळा सरबत गुणकारी आहे. आवळ्याचा तुरटपणा कमी करण्यासाठी या सरबतासोबत गूळ जरूर वापरावा.
ताडगोळा
उन्हाळ्यात बाजारात प्रामुख्याने मिळणारे हे फळ बाहेरून हिरवट तांबडे दिसते. छोटेखानी शहाळ्यासारखे दिसणारे हे फळ आतून मऊ आणि रसाळ असते. चवीला गोड आणि तुरट यांचे मिश्रण असणारे हे फळ उन्हाळ्यात शरीरासाठी सर्वोत्तम मानले जाते. एकाच वेळी भूक आणि तहान दोन्ही शमविणारे आणि योग्य प्रमाणात ऊर्जा पुरविणारे हे फळ क्षार, कर्बोदके आणि ऊर्जा यांचे योग्य मिश्रण असणारे आहे.
वाळ्याचे सरबत
वाळा म्हणजे वरवर तांबडं दिसणारे हे औषधी मूळ शरीरातील उष्णता कमी करण्यास्तवही तसेच उन्हाळ्यात शरीराचे तापमान राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. वाळा पाण्यात भिजवून त्याचे सरबत आहारात समाविष्ट केल्यास शरीरात उन्हामुळे वाटणारी लाही कमी होण्यास मदत होते. ज्यांना अस्थमा किंवा दमा आहे त्यांनी वाळ्याचे अतिरेकी प्रमाण टाळावे
गुलाबाच्या पाकळ्यांचे पाणी
गुलकंद उन्हाळ्यात नियमितपणे खावा याबद्दल नेहमी सांगितले जाते. त्याचप्रमाणे गुलाबाच्या भिजविलेल्या पाकळ्यांचे पाणी देखील उष्माघाताचे परिणाम कमी करण्यासाठी गुणकारी ठरते.
जाम
लालसर रंगाचे काजूसारखे दिसणारे हे फळ उन्हाळ्यात आर्द्रता वाढविणारे, भूक शमविणारे आणि शरीरातील साखर नियंत्रणात राखणारे आहे. जाम हे फळ आहारात सॅलड सोबत समाविष्ट केल्यास विशेष चविष्ट लागते.
काकडी
काकडीचा रस, काकडीचा कोरडा, काकडीचे धिरडे अशा विविध स्वरूपात काकडी आहारात समाविष्ट केली जाऊ शकते. काकडी हे ७०-८०% पाणी असते. काकडीचा रस केवळ उष्णता कमी करण्यासाठीच नव्हे तर उच्च रक्तदाब आटोक्यात आणण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
जास्वंद फूल
ज्यांना चहा वारंवार पिण्याची सवय आहे, त्यांच्यासाठी जास्वंदाच्या फुलाच्या चहाने उत्तम परिणाम मिळतात. गरम किंवा थंड अशा दोन्ही स्वरूपात जास्वदांच्या फुलाचा अर्क चहाऐवजी प्यायला जाऊ शकतो.
ज्येष्ठमध
आयुर्वेदातदेखील औषधी मानली जाणारी ज्येष्ठमध उन्हाळ्यातून पाण्यात उकळून पिण्यासाठी गुणकारी आहे. ज्येष्ठमधाचा अर्क काढून तो रोज अर्धा चमचा खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यात मदत होते . शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करणे, उष्णता कमी करणे तसेच उन्हाळ्यातून होणाऱ्या सर्दी -खोकला पडसे यात औषध म्हणून ज्येष्ठमध उपयुक्त आहे . मधुमेहींसाठी ज्येष्ठमध उकळून केलेला आयुर्वेदिक चहा उन्हाळ्यातून अत्यंत उपायकारक ठरतो.