
माणदेश एक्स्प्रेस न्यूज|मुंबई : राजकीय वर्तुळात शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार, अशा चर्चांना उधाण आले असताना केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी यावर प्रतिक्रिया देत मोठं भाकीत वर्तवलं आहे. “शरद पवार फार काळ कुणासोबत टिकत नाहीत. जर ते अजित पवारांसोबत आलेच, तर त्याचा फटका राष्ट्रवादीला बसणार असून भाजपलाच फायदा होईल,” असं राणे यांनी ठामपणे सांगितलं.
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवरून शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना राणे यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार शब्दांत हल्लाबोल केला. “पाऊस जुलै-ऑगस्टमध्येही पडतो. मदतीऐवजी टीका करतात, नावं ठेवतात. तुम्हालाही नावं ठेवली तर चालेल का?” असा सवाल करत त्यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली.
राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करताना म्हटलं, “त्यांना धड मराठी बोलता येत नाही. तोतरे बोलतात. आम्ही त्यांची नक्कल केली तर काय होईल? उद्धव ठाकरेंची नक्कल केली तर चालेल का? आरशात तोंडे पाहा. अमित शाह यांचं नाव घेऊन स्वतःच अडचणीत येणार आहात.”
राणे यांनी ठाकरे गटावर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरूनही घणाघात केला. “उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचारावर बोलूच नये. डिनो मोरियाच्या कितीतरी कंपन्या आहेत. केतन कदम मिठी नदी प्रकरणात अटकेत आहेत. डिनो मोरिया आणि कदम यांच्यातील संबंध माझ्याकडे पुराव्यासकट आहेत. 1985 पासूनचा संपूर्ण हिशेब माझ्याकडे आहे. परदेशातील गुंतवणुकीबाबतचीही माहिती लवकरच उघड करणार,” असा इशारा त्यांनी दिला.
भविष्यात ठाकरे गटाला अधिक मोठा फटका बसेल, असा इशाराही राणे यांनी दिला. “आता वीस आमदार आहेत, पुढच्या वेळी पाचही राहणार नाहीत,” अशी बोचरी टिप्पणी करत त्यांनी ठाकरे गटाच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राणे यांच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील हालचाली आणि महाविकास आघाडीत असलेल्या पक्षांच्या नातेसंबंधावर चर्चा सुरू झाली आहे.