
माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे– राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींच्या शक्यता दिसत असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उबाठा) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये युती होणार असल्याच्या चर्चेला आता महाविकास आघाडीतील नेत्यांचा सकारात्मक सूर लाभू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, “राज ठाकरे महाविकास आघाडीत आल्यास आघाडीची ताकद निश्चिचतच वाढेल.”
याआधी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी युतीविषयी सकारात्मक संकेत दिले होते. आता जयंत पाटील यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत मनसेचा समावेश होण्याच्या शक्यतेला अधिक बळ मिळालं आहे.
“शिवसेनेने निर्णय घ्यावा” – जयंत पाटील
जयंत पाटील म्हणाले, “ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचं काम माध्यमं करत आहेत. शिवसेनेने मनसेला घ्यायचे की नाही, हे त्यांचं ठरवायचं आहे. राज ठाकरे प्रभावी वक्ते आहेत. ते महाविकास आघाडीत आले, तर ताकद वाढेल. त्यांच्याशी युती करण्यात काहीच गैर नाही.” त्यांच्या या वक्तव्यावरून महाविकास आघाडीच्या दृष्टीने मनसेला एक सकारात्मक पर्याय म्हणून पाहिले जात आहे. सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी म्हटले होते की, “ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्रासाठी हे एक चांगलं पाऊल ठरेल.”
राज ठाकरे सध्या शांत, मनसेची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट नाही
दरम्यान, राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत युतीसंदर्भात कोणतीही वक्तव्ये न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मनसेकडून अद्याप अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.
राजकारणात नवा समीकरणांचा विचार सुरू
मुंबई महापालिका निवडणूक, तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. भाजपच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी एकत्र येणं, आणि महाविकास आघाडीत मनसेचा समावेश होणं, हे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्यास कारणीभूत ठरू शकते.
निवडणूक आयोगावरही टीका
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर घेतलेल्या आक्षेपांवर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “निवडणूक आयोगानेच यावर उत्तर देणे आवश्यक आहे. भाजप नेत्यांनी या विषयावर बोलणे उचित नाही.”