
मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात हिंदी सक्तीविरोधात मराठी भाषेच्या रक्षणासाठी उभारलेल्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर आता मराठी विरुद्ध अमराठी असा वाद अधिकच चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत. नुकतीच मीरारोडमध्ये एका दुकानदाराला मराठीत बोलण्यास नकार दिल्याने मारहाण झाली होती. या घटनेनंतर आता प्रसिद्ध व्यावसायिक आणि Kedionomics चे संस्थापक सुशील केडिया यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना थेट सोशल मीडियावर डिवचलं आहे.
“मी मराठी शिकणार नाही, बोलायचं असेल तर बोला!”
सुशील केडिया यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर) वरून एक पोस्ट करत राज ठाकरे यांना थेट टॅग करत लिहिलं आहे –
“गेली ३० वर्षे मी मुंबईत राहतो, तरी मला मराठी फारशी येत नाही. आणि मी ती शिकणारही नाही. तुमच्यासारख्या लोकांना जर मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी असेल, तर मला ती भाषा शिकण्याची गरज वाटत नाही. काय करायचं ते करा!” त्यांच्या या पोस्टनं मराठीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे.
मीरारोडच्या घटनेची पार्श्वभूमी
काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरारोडमध्ये एका अमराठी दुकानदाराला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. कारण फक्त इतकंच होतं की, त्याने ग्राहकाशी मराठीत बोलण्यास नकार दिला होता.
या घटनेवर मनसेच्या भूमिकेवर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या. त्याच वादावरून सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना उद्देशून हे परखड वक्तव्य केलं आहे.
सोशल मीडियावरुन थेट आव्हान
सुशील केडिया हे सामाजिक, आर्थिक विषयांवर आपली मते मांडणारे, आणि गुंतवणूकविषयक अभ्यास करणारे प्रसिद्ध ट्विटर इन्फ्लुएन्सर आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या असून, “मराठी माणसाचा अपमान सहन केला जाणार नाही,” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.
मनसेकडून काय उत्तर येईल?
राज ठाकरे यांना थेट टॅग करून “मी मराठी शिकणार नाही” असं म्हणणं ही केवळ भाषा नाकारण्याची बाब नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेलाच आव्हान आहे, असं भाष्य काही नेटकऱ्यांनी केलं.
आता मनसेकडून किंवा राज ठाकरे यांच्याकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.