
मुंबई (प्रतिनिधी) : आगामी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ५ जुलैच्या एकत्र विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी या दोघांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेना संपवण्याचा आरोप करत, राज ठाकरे यांनाही सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. रामदास कदम यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकजुटीपूर्वीच राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.
‘उद्धव ठाकरेंनीच शिवसेना संपवली’
“शिवसेनेला संपवण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. त्यांनीच हिंदुत्व सोडलं, काँग्रेसशी गटबंधन केलं आणि आता हिंदी सक्तीच्या विरोधात विजय साजरा करतात. हे हास्यास्पद आहे,” अशा शब्दांत रामदास कदम यांनी टीकास्त्र सोडलं.
मुंबईत मराठी माणूस उरला कुठे?
रामदास कदम म्हणाले, “मुंबई महापालिकेत २५ वर्षे सत्ता असताना मराठी माणसासाठी काय केलं? मराठी माणूस दादर-गिरगावातून अंबरनाथ-कल्याणला गेला. आज मुंबईत मराठी माणूस फक्त १७ टक्के उरला आहे. सोसायट्यांमध्ये मांस खाण्यावर बंदी घातली जाते, तेव्हा ठाकरे बंधू कुठे असतात?”
राज ठाकरेंना सावध राहा – कदमांचा सल्ला
रामदास कदम यांनी राज ठाकरे यांनाही थेट इशारा दिला. “उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे झाले नाहीत, तुमचे कसे होतील? त्यांचा दाखवायचा चेहरा वेगळा आणि आतला वेगळा आहे. तुम्हाला फक्त वापरून घेतील,” असा इशारा त्यांनी दिला.
“राज ठाकरेंनी भावनेच्या आहारी न जाता, वास्तव समजून घेऊन पुढचा विचार करावा,” असाही सल्ला दिला.
“निवडणुका आल्या की उद्धव पुन्हा काँग्रेसकडे!”
“मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या की उद्धव पुन्हा काँग्रेसकडे जातील,” असा ठाम दावा करत कदम म्हणाले, “मनोहर जोशी यांना लाखोंच्या समोर मंचावरून उतरवलं, रावतेंना काहीच दिलं नाही. त्यामुळे उद्धव यांचा स्वभावच वापरून फेकण्याचा आहे.”
“पळ मेल्यानंतर शेवटी वावळतोय!”
आपल्या बोचऱ्या शैलीत रामदास कदम म्हणाले, “उद्धव ठाकरे कोणाचा भाऊ होऊ शकत नाही. पळ मेल्यानंतर शेवटी वावळतोय,” असा टोलाही त्यांनी लगावला.