
माणदेश एक्स्प्रेस|सांगली : सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी गावात एक आदर्श आणि चर्चेत राहिलेला विवाहसोहळा नुकताच पार पडला. परशुराम माळी या शेतकऱ्याच्या विजय या मुलाचा विवाह पारंपरिक रूढी-परंपरांना फाटा देत सत्यशोधक पद्धतीने साध्या पण प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यात आला. या विवाहात ना मानपान होता, ना वाजंत्री, ना वरात – पण विचारांचा आणि माणुसकीचा मोठा ठेवा उपस्थित होता.
या विवाहसोहळ्यात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत ‘शेतकऱ्याचा आसूड’ आणि महापुरुषांच्या प्रेरणादायी पुस्तकांनी करण्यात आले. महात्मा बसवेश्वर आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त, तसेच नववधू पूनम माळी हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा विवाह साजरा करण्यात आला. या विवाहाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, पारंपरिक सुवासिनींऐवजी गावातील विधवांच्या हस्ते हळद दळण्याचा कार्यक्रम पार पडला. समाजाने जेथे विधवांवर अनेक बंधने लादली आहेत, तिथे या सोहळ्यात त्यांना केंद्रस्थानी आणून सन्मान देण्यात आला.
या विवाहास आमदार अरुण लाड, माजी जि.प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, हर्षवर्धन पाटील, ॲड. सुभाष पाटील, मोहनराव यादव, सरपंच वंदना सूर्यवंशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी या विवाहाचे खुलेपणाने कौतुक केले.
या विवाहात हार-तुरे, भटजी, मंगलाष्टक, मुहूर्तमेढ, वाजंत्री, घोडे, वरात असा कोणताही खर्च केला गेला नाही. मुलीकडून कोणतीही भेट वस्तू मुलाला देण्यात आली नाही. हा संपूर्ण विवाह अत्यंत कमी खर्चात आणि सामाजिक समतेचे भान ठेवून पार पडला.
“शेतकऱ्याची व्यथा मी स्वतः अनुभवली आहे. म्हणून मी माझ्या दोन्ही मुलांचे विवाह सत्यशोधक पद्धतीने केले. पैसा दवडून दिखाऊपणा करण्याऐवजी तो शिक्षण, शेती आणि विकासावर खर्च करावा,” अशी स्पष्ट भूमिका विजयचे वडील परशुराम माळी यांनी मांडली. हा विवाह ग्रामीण भागात लग्नसंस्कारांतील बदलत्या प्रवाहाचे प्रतिक बनला आहे. समाजासाठी हा एक अनुकरणीय आदर्श ठरत असून, नव्या विचारांची बीजे रोवणारा प्रेरणादायी प्रसंग ठरतो आहे.