
माणदेश एक्स्प्रेस न्यूज|मिरज : मिरजमधील एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी डॉ. सुयोग ऊर्फ बॉबी अरवट्टगी याला गोव्यातून अटक करण्यात आली. गोव्यातील कांकोलीम येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉ. अरवट्टगी यांच्यावर पीडित परिचारिकेने गंभीर आरोप केला असून, याप्रकरणी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक महिना पूर्वी पीडित परिचारिका रुग्णालयात काम करत असताना, डॉ. अरवट्टगी यांनी तपासणीच्या बहाण्याने तिला त्यांच्या निवासस्थानी नेले. तेथे तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली. या धक्क्यामुळे मानसिक तणावात गेलेल्या पीडितेने नंतर गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान पीडितेने संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तिच्या आईने गोव्यातील कांकोलीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसांनी तत्काळ कारवाई करत बलात्काराचा गुन्हा नोंदवून डॉ. अरवट्टगी याला अटक केली. प्रारंभी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, संबंधित डॉक्टरविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.