गौतमी पाटीलच्या घायाळ अदा,ठसकेबाज अंदाजाची प्रेक्षकांना भुरळ;“या” सिनेमातील गौतमीच गाणं रिलीज

0
210

प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील(Gautami Patil)ने अनेक स्टेज शोमध्ये आपल्या नृत्याने लोकांना भुरळ घातली आहे. त्यानंतर ती काही सिनेमातही लावणीवर थिरकताना दिसली आहे. आता ती आणखी एका सिनेमातील गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे. हा चित्रपट म्हणजे ‘आंबट शौकीन’ (Ambat Shaukeen Movie). या आगामी मराठी चित्रपटातील ‘तंबू पिरमाचा पेटला’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्यात गौतमी पाटीलच्या ठसकेबाज अंदाज पाहायला मिळत आहे. गाण्याच्या एनर्जेटिक संगीताने व नृत्याने गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

 

या गाण्याला पियुष कुलकर्णी, ओंकारस्वरूप बागडे आणि अजित विसपुते यांचे दमदार स्वर लाभले आहेत. संगीतकार साई-पियुष यांच्या जोशपूर्ण बीट्समुळे गाण्याला एक हटके आणि एनर्जेटिक टोन लाभला आहे. तर गीतकार संदेश राऊत यांनी हे गाणे लिहिले आहे. तसेच राहुल ठोंबरे यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. राहुल ठोंबरेंनी गौतमी पाटीलच्या ॲटिट्यूड व एनर्जीला तडफेने सादर करण्याची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली आहे.

 

दिग्दर्शक निखिल वैरागर म्हणतात, ”’तंबू पिरमाचा पेटला’ हे गाणे शूट करताना आम्ही फार मजा केली. अर्थातच गौतमी पाटीलमुळे या गाण्याला चारचांद लागले. ती एक उत्तम नर्तिका आहे आणि तिच्यामुळे या गाण्याला अजूनच रंगत आली असे मी म्हणेन. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे व प्रत्येकाच्या पार्टी प्लेलिस्टमध्ये हे गाणे असेल हे नक्की.”

 

 

हेक्सव्हिजन एंटरटेनमेंट, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘आंबट शौकीन’ या चित्रपटात पूजा सावंत, अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, किरण गायकवाड, प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ, चिन्मय संत आणि राहुल मगदूम यांसारखे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार पाहायला मिळतील. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन व कथा निखिल वैरागर यांची असून प्रफुल्ल काकाणी, रंजना मोहित लखोटिया, अनघ भुतडा व निलेश राठी निर्माते आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अक्षय टंकसाळे व अमित बेंद्रे यांचे आहेत. येत्या १३ जून रोजी ‘आंबट शौकीन’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here