
मार्वे बीचवर सापळा रचून कारवाई; २३ लाखांचा मुद्देमाल जप्त
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : बनावट नोटांची छपाई करून त्याद्वारे चलनात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा आरोपींना मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ५०० रुपयांच्या तब्बल १,७४० बनावट नोटा (एकूण किंमत ८ लाख ७० हजार रुपये) आणि नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या कारवाईमुळे मुंबईसह राज्यभरात बनावट चलनप्रकरणी खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे संपत एन्जपल्ली (४६) आणि रहीमपाशा शेख (३०) अशी असून, दोघेही तेलंगणा राज्यातील रहिवासी आहेत.
२९ मे रोजी मालवणी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे हे निगराणी पथकासह गस्त घालत असताना मार्वे बीच परिसरात एका निळ्या रंगाच्या कारकडे त्यांचे लक्ष गेले. ती कार संशयास्पदरीत्या उभी असल्याने तपासणी करण्यात आली. यावेळी कारमधील व्यक्तींकडे बनावट नोटा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश नगरकर यांना माहिती देण्यात आली.
यानंतर परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. डॉ. हिंडे, पोलिस हवालदार अनिल पाटील, जगदीश घोसाळकर, शिपाई सुशांत पाटील, सचिन वळतकर, मुदसीर देसाई, समित सोरटे आणि कालिदास खुडे यांनी सापळा रचून कारमधील दोघांना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान त्यांच्या कारची झाडाझडती घेतली असता ५०० रुपयांच्या १,७४० बनावट नोटा, छपाईसाठी वापरण्यात येणारे प्रिंटर, लॅपटॉप, पिंक पेपर, कटर, सेलोटेप, कैची, स्केल यांसह एकूण २३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यामध्ये वापरलेली चारचाकी वाहनही समाविष्ट आहे.
पोलिसांनी आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, बनावट नोटा तयार करण्यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.