डोंबिवली एमआयडीसी फेज-2 मधील कंपनीत स्फोट, नागरिकांमध्ये घबराट

0
2

डोंबिवली एमआयडीसी फेज-2 मधील मालदे आणि इंडो अमाईन्स कंपनीत स्फोट झाल्यानंतर ही आग लागली आहे. आग लागल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.फायर ब्रिगेडच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ठाणे आणि कल्याण अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. पाण्याचे टँकर उभे आहेत. युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम सुरु आहे. कंपनीमध्ये काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या परिसरातून स्फोटाचे आवाज येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरातील अभिनव शाळेजवळ ही घटना घडल्याने शाळेच विद्यार्थी आणि येथील परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

रहिवासी दडपणाखाली

कंपनीत स्फोट झाल्याने ही घटना घडली आहे. या कंपनीच्या शेजारील कंपनीतही आगीचे लोट पसरल्याचे समोर येत आहे. या स्फोटामुळे डोंबिवली परिसरात धुराचे लोट पसरले आहे. तर कंपनीतील कामगारांनी घटनास्थळावरुन पळ काढला आहे. या परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यांना तातडीने घरी पाठविण्यात आले आहे. तर या परिसरातील इतर कंपन्यांमधील कामगारांना पण बाहेर काढण्यात आले आहे. या स्फोटामुळे कंपनीच्या बाहेरील वाहनांचे नुकसान झाले आहे. तातडीने हा परिसर मोकळा करण्यात आला आहे. धुराचे लोट सर्वदूर दिसत आहेत.

स्थलांतरासंबंधी लवकरच धोरण

डोंबिवली एमआयडीसीतील आगीची दुर्घटना दुर्दैवी आहे. तातडीने या परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात आले आहे. तर हा परिसर मोकळा करण्यात आला आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर कार्यकर्ते लोकांना या परिसरातून बाहेर काढण्यासाठी मदत करत आहे. वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने मुख्यमंत्री, एमआयडीसीचे अधिकारी आणि स्थानिक उद्योजकांमध्ये बैठक झाली होती. त्यात या कंपन्या बाहेर स्थलांतरीत करण्यासंबंधीच्या धोरणावर चर्चा झाली. त्यातच ही दुसरी आग लागली आहे. यासंबंधीच्या धोरणावर लवकरच अंमलबाजावणी होण्याविषयीची पावलं उचलण्यात येतील, अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.