
माणदेश एक्सप्रेस न्यूज
सांगली : राज्यभरात लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात धडाकेबाज मोहीम सुरू केलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आता सांगली महापालिकेचे उपायुक्तच रडारवर आणले आहेत. तब्बल ७ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी उपायुक्त वैभव साबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सांगली महापालिकेच्या हद्दीत एका २४ मजली इमारतीच्या परवानगीसाठी उपायुक्त साबळे यांनी तब्बल १० लाख रुपयांची लाच मागितली होती, अशी माहिती आहे. त्यावर तडजोड होऊन ७ लाख रुपयांवर सौदा ठरला होता. संबंधित तक्रारदाराने ही माहिती थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानंतर विभागाने सापळा रचत साबळे यांच्या लाच मागणीचे ठोस पुरावे गोळा केले.
या प्रकरणावरून ACB च्या अधिकाऱ्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून लवकरच आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शहराच्या नागरी विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उपायुक्ताच्या लाच प्रकरणामुळे महापालिकेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांत संताप व्यक्त होत असून, आरोपी अधिकाऱ्याविरोधात कठोर कारवाईची मागणी होऊ लागली आहे.