
अमरसिंह देशमुख : दोन नवीन शाखा सुरु होणार
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडीच्या दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेला आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ७.४७ कोटीचा नफा झाला असून, बँक चालू आर्थिक वर्षात दोन नवीन शाखा सुरु करणार असल्याची माहिती बँकेचे संस्थापक अमरसिंह देशमुख, अध्यक्ष दादासाहेब पाटील, उपाध्यक्ष जयंत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अध्यक्ष दादासाहेब पाटील म्हणाले की, बँकेची आर्थिक स्थिती रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे भक्कम असल्यामुळेच व रिझर्व बँकेच्या नियमांचे तंतोतंत पालन केल्याने रिझर्व बँकेने पंढरपूर व जत या दोन नवीन शाखा उघडणेस या आर्थिक वर्षात मंजूरी दिली आहे. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य करणेस पुर्व परवानगी दिली आहे. रिझर्व बँकेने मंजूर केलेल्या या दोन नवीन शाखा आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँक लवकरच सुरु करणार असल्याचे अमरसिंह देशमुख म्हणाले.
बँकेने ग्राहकांना मोबाईल बँकींग, आरटीजीएस, यूपीआय, सिटीएस क्लिअरींग, एटीएम, फास्टग या सर्व डिजिटल सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. बँकेचे सर्व संचालक मंडळ, सर्व कर्मचारी, सभासद, ठेवीदार व कर्जदारांच्या सहकार्यामुळेच बँकेने प्रगती केले असलेचे अमरसिंह देशमुख यांनी सांगितले. बँकेचे अध्यक्ष दादासाहेब पाटील, उपाध्यक्ष जयंत देशपांडे, व्यवस्थापकीय संचालक भगवंत पाटील-आडमुठे, सर्व संचालक मंडळ व बँकेचे कर्मचारी यांच्या अथक परिश्रमामुळेच बँकेने भरीव प्रगती केली आहे.
मार्च २०२५ अखेर बँकेची स्थिती
बँकेच्या ठेवी : ४५५.४९ कोटी
कर्जे वाटप : २९८.४५ कोटी
भाग भांडवल : १९.१२ कोटी
स्वनिधी : ४३.५३ कोटी
गुंतवणूक : १९५.४८ कोटी
ढोबळ नफा : ७.४७ कोटी
निव्वळ नफा : ४.२४ कोटी
एनपीए : ०.०० टक्के
सभासद : १० टक्के लाभांश
एकूण व्यवसाय : ७५३.९४ कोटी
दोन नवीन शाखेमुळे व्यवसाय वाढणार
या आर्थिक वर्षात आटपाडी तालुक्यात तीव्र दुष्काळ पडूनही बँकेने बँकिंग क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. बँकेच्या सध्या १० शाखा व प्रधान कार्यालय असून पंढरपूर व जत या दोन नवीन शाखांमुळे बँकेचा व्यवसाय वाढविणेस मदत होणार आहे.