क्रेनने चिरडल्याने सायकलस्वाराचा जागीच मृत्यू; आरोपीला अटक, तपास सुरु

0
7

 

पुण्यातील कर्वे रोडवर एका अपघातात सायकलस्वाराने आपला जीव गमावल्याची घटना समोर आली आहे. आज, 1 जून रोजी कर्वे रोडवरील नळ स्टॉपजवळ झालेल्या या अपघातात सायकलस्वाराचा मृत्यू झाला. या ठिकाणी सकाळी साधारण साडेनऊच्या सुमारास क्रेनने सायकलस्वाराला चिरडले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सायकलस्वर डेक्कनच्या दिशेने जात असताना कर्वे रोडवरील सोनल हॉलसमोर ही घटना घडली. शवविच्छेदन अहवालासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कर्वे रोडवर सध्या सुरू असलेल्या फूटपाथ आणि सायकल मार्गाच्या बांधकामामुळे रस्ता अरुंद झाला आहे, त्यामुळे सायकलस्वारांना या ठिकाणाहून मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. या अपघाताबाबत डेक्कन जिमखाना पोलीस तपास करत असून, क्रेन ऑपरेटरला ताब्यात घेतले आहे. मृत सायकलस्वाराची ओळख अद्याप पटलेली नाही.