‘महाराष्ट्राच्या भावनांसोबत खेळणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा’-संजय राऊत

0
115

संजय राऊत म्हणाले की, 1956 साली पंडित नेहरूंनी प्रतापगडावर एक पुतळा बसवला. तो पुतळा आताही त्या स्थितीत आहे. शिवरायांचा असा अपमान मुघलांनीदेखील केलेला नाही. पण आठ महिन्यात सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा पुतळा बेईमान आणि गद्दारांच्या सरकारने बनवला होता, तो कोसळला. त्यांनी चांगल्या मनाने पुतळा बनवला नव्हता. राजकीय मनाने बनवला होता. महाराष्ट्राच्या भावनांसोबत खेळणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना बरखास्त केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

कमीत कमी शिवाजी महाराजांना तरी सोडा
ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा या लोकांनी सोडलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामात सुद्धा या लोकांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला. सार्वजनिक बांधकाम खात्याने आणि सरकारने आपापल्या लोकांना टेंडर दिली. कमीत कमी शिवाजी महाराजांना तरी सोडा. ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाही ते लाडक्या बहि‍णींच्या गोष्टी करत आहेत. यावर महाराष्ट्र शांत बसणार नाही. महाविकास आघाडी या विषयाचा अत्यंत गांभीर्याने विचार करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचाराबाबतची प्रत्येक गोष्ट आम्ही जनतेला सांगणार आहोत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

सर्व ठेकेदार मुख्यमंत्र्यांचे मित्र, शिवरायांचा पुतळा बनवणाराही ठाण्याचाच
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, त्या ठिकाणी हवा जास्त असल्यामुळे पुतळा कोसळला. याबाबत विचारले असता संजय राऊत राऊत म्हणाले की, त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. त्यामुळे ते जमिनीपेक्षा वर उडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनासाठी आले होते. भारतीय नौदलाचा हा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम अतिशय घाईगडबडीत लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी घेण्यात आला. ही केवळ श्रेयवादाची लढाई होती. तेव्हा संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले होते की, तुम्ही एवढी घाई गडबड करू नका. मात्र आता लक्षात आले आहे की, सर्व ठेकेदार मुख्यमंत्र्यांचेच मित्र होते. पुतळा बनवणारा देखील ठेकेदार मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील होता. आता पुतळा तुटला आहे. महाराष्ट्रावर खूप मोठा आघात झाला आहे. त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे, अशी खरपूस टीका त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

पंतप्रधान जिथे हात लावतात त्याची माती होते
संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान जिथे हात लावतात त्याची माती होते. अयोध्यातील राम मंदिराला हात लावला, तिथे पाणी गळतीला सुरुवात झाली. संसदेत पाणी गळती झाली. ज्या पुलांचे उद्घाटन केले ते पूल उद्ध्वस्त होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हात लावला तो कोसळला. पंतप्रधान जिथे हात लावता ते उद्ध्वस्त होते. देश सुद्धा उद्ध्वस्त झाला आहे, असे टीका त्यांनी यावेळी केली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here