महत्वाची बातमी! ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात ‘या’ तारखेला येणार तीन हजार

0
2237

लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे. या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली. दुसरा राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा 31 ऑगस्टला नागपूरमध्ये होत आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत. त्यांच्या अर्जांची छाननी सुरु असून त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळतील, असं अदिती तटकरे म्हणाल्या.

ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जांनुसार नागपूरच्या कार्यक्रमात 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत. यापूर्वी पुण्यात पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पार पडला होता. त्यावेळी जुलै महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिला अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या 1 कोटी आठ लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले होते.

राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती एप मधून अर्ज दाखल करुन घेतले होते. ज्या महिलांच्या खात्यात सरकारनं पैसे पाठवले होते त्यामधील काही रक्कम बँकांनी कपात केली होती. मात्र, राज्य सरकारनं बँकांना आदेश देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांची कपात न करता ते महिलांना द्यावेत, असे आदेश दिले होते.

राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी विविध जिल्ह्यात कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. त्याशिवाय पुण्यातील पहिल्या राज्यस्तरीय निधी वितरण सोहळ्यानंतर आता दुसरा सोहळा नागपूरमध्ये आयोजित केला जाणार आहे.