
माणदेश एक्सप्रेस/पुणे : राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे पुण्यात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत तिसरे विश्व मराठी संमेलन होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करत असताना त्यांनी खुमासदार भाष्य केले. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा संमेलनात गौरव करण्यात आला. यावेळी विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने उद्भवलेल्या वादावर फडणवीस यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “साहित्य संमेलन असो, नाट्य संमेलन असो, विश्व मराठी साहित्य संमेलन असो, तिथे वाद निर्माण झाला नाही तर ते संमेलन असूच शकत नाही. वाद निर्माण करणे हा आपला स्थायी भाव आहे. कारण आपण संवेदनशील, भावनाप्रधान लोक आहोत, त्यामळे वाद-प्रतिवाद हा झालाच पाहिजे. यातूनच खऱ्या अर्थाने मंथन होत असते.”
वादाबाबत बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठव्या शतकातील एका पुस्तकाचा दाखला दिला. ज्यात मराठी माणसाचे गुण आणि अवगुण याबाबत माहिती दिलेली आहे. मराठी माणूस हा कलहशील असल्याचे आठव्या शतकात लिहून ठेवलेले आहे. मराठी माणसाला कलह करायला आवडतो, म्हणून आपण संमेलन आयोजित करण्याचे थांबणार नाही. अशा संमेलनातूनच चांगले काम करण्याची शक्ती आणि बुद्धी आपल्याला मिळत असते.
“वादाच्या पुढे जाऊन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विश्व मराठी संमेलन आयोजित करून दाखविले त्याबद्दल उदय सामंत यांचे फडणवीसांनी आभार व्यक्त केले. जगभरात असा एकही देश नाही, जिथे मराठी माणूस पोहोचलेला नाही. कोणत्याही देशात आम्ही दौऱ्यासाठी गेलो तरी तिथे स्वागतासाठी मराठी माणसे लांबून लांबून येतात. हे बघून अतिशय आनंद वाटतो. नुकतेच दावोसला गेलो असताना तिथे काही मराठी मंडळींनी माझे स्वागत केले. एका लहान मुलाने “लाभले आम्हास बोलतो मराठी…”, हे गाणं सुंदर पद्धतीने सादर केले. त्यात त्याने मी पुन्हा येईन.. असेही म्हटले”, अशी आठवण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.
ते पुढे म्हणाले, ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य आता माझा पिच्छाच सोडत नाही. पण हल्ली चांगल्या अर्थाने हे वाक्य म्हणतात. मागच्या काळात हे उपहासाने म्हटले जायचे. एखादा शब्द जेव्हा आपल्याला चिकटतो तेव्हा काळ आणि वेळेनुसार त्याचे अर्थ बदलत असतात. पण विश्व मराठी संमेलनासाठी आज आलेल्या लोकांनी हे ठरविले पाहिजे की, जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन भरवले जाईल, तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन…”