
माणदेश एक्सप्रेस न्यूस : सांगली : लेंगरे व आटपाडी येथे घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. अटक केलेला आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. लखन संभाजी चव्हाण वय ३५ रा. बादलकोट, करकंब ता. पंढरपूर, जि. सोलापूर असे नाव आहे. त्याच्याकडून एक लाख ८० हजाराचे सोन्याच्या दागिने आणि २० हजाराचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
१० एप्रिल रोजी खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे एक घरफोडी झाली होती. त्याचा तपास सुरू होता. पण त्यातील संशयित आढळून येत नव्हता. या अनुषंगाने स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने गुन्हयाचा उकल काढण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांना विटा येथे बळवंत कॉलेज जवळ एक व्यक्ती संशयितरित्या उभा राहिल्या असल्याची माहिती मिळाली.
स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने तपासणी केली असता त्याच्याकडे सोन्याचे आणि चांदीचे दागिने आढळून आले. त्याच्याकडे या दागिन्याची माहिती विचारली असता त्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला ताब्यात घेवून चौकशी सुरू केली असता त्याने खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.
त्यानंतर आणखीन चौकशी केली असता आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी येथेही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करून त्याच्याकडील दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याला पुढील तपासासाठी विटा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक सिंकदर वर्धन, प्रमोद साखरपे, सुनिल जाधव अभिजीत ठाणेकर यांनी पार पाडली.