
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील मधुकर नारायण दबडे वय ५८ यांचा अज्ञात चोरट्याने बंगला फोडून १५१ ग्राम सोन्याचे दागिने, 300 ग्रॅम चांदीचे दागिने आणि 6 लाख 43 हजारांची रोकड असा सुमारे 20 लाखांचा ऐवज लंपास केला. गोमेवाडीत मंगळवारी भर दुपारी २:३० ते सायंकाळी ०६:३० या चार तासांच्या कालावधीत घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मधुकर दबडे यांचा बंगला करगणी रस्त्यावर दबडे वस्तीवर आहे. मधुकर दबडे यांचे गोमेवाडीत पशुखाद्याचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी ते दुकानात गेले होते. तर घरातील सर्वजण आटपाडीला चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
घरातील कपाटात ठेवलेले पन्नास ग्रॅमचे गळ्यातील चेन मधील सोन्याचे गंठण, गळ्यातील चेन, गंठण, मिनी गंठण, कानातील टॉप्स, सोन्याचे झुमके व वेल, तीन सोन्याची नाणी, दोन बदाम, चांदीचे पैंजण व जोडवी आणि 6 लाख 43 हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरट्याने पलायन केले. गोमेवाडी गावात ही माहिती कळताच आसपासच्या ग्रामस्थानी गर्दी केली होती. घरफोडीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनय बहिर आणि पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव करत आहेत.