विटा : राहुल जाधव खून प्रकरणी; तिघांना अटक

0
704

माणदेश एक्सप्रेस/सांगली : मारहाण केल्याच्या रागातून एका तरुणाचा तलवार, गुप्ती, हॉकीस्टिकने हल्ला करून खून करण्यात आल्याची घटना विट्याजवळ कार्वे येथे मध्यरात्री घडली. या प्रकरणी सात संशयितांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली असून अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याचे उपअधीक्षक विपुल पाटील यांनी सांगितले.

 

राहुल गणपती जाधव (वय ३५ रा.कार्वे, ता. खानापूर) हे काल रात्री इर्टिगा मोटारीने निघाले असता कार्वे गावच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या पुलावर अडवून त्यांच्या मोटारीवर हल्ला करत त्यांच्यावर तलवार आणि गुप्तीने वार करण्यात आले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती पोलिसांना अज्ञाताकडून मध्यरात्री दीड वाजता मिळाली.

 

काही दिवसांपूर्वी रणजिराज ढाब्याचे चालक माणिक परीट यांच्यात आणि मृत जाधव यांच्यात बारमध्ये वाद झाला होता. या वेळी जाधव यांनी परीट यांना मारहाण केली होती. या मारहाणीच्या रागातून जाधव यांच्यावर जमाव करून हल्ला केला असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

 

याबाबत विटा पोलीस ठाण्यात राजाराम जाधव यांनी सात जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे, तर अन्य चार जण संशयितांचा शोध पोलिसांचे पथक घेत असल्याचे उपअधीक्षक पाटील यांनी सांगितले.