मोठी अपडेट!महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा कधी होणार?

0
406

लोकसभा निवडणुकांनंतर आता राज्यातील राजकारण्यांप्रमाणे राज्यातील जनतेलाही निवडणुकांचे वेध लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारणात विविध घडामोडी घडताना दिसत आहे. एकीकडे पक्षांमध्ये जागावाटप, मुख्यमंत्रिपद याबद्दल चर्चा सुरु असताना दुसरीकडे सत्ताधारी विरोधकामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अखेर आता याबद्दलची मोठी माहिती समोर आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात येणार आहे. येत्या २६ सप्टेंबरपासून केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम चार दिवस महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाची टीम विधानसभा निवडणुकीबाबत माहिती घेणार आहे. तसेच राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली जाणार आहे.

राज्यातील विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्राचा दौरा आयोजित केला आहे. येत्या 26, 27 आणि 28 सप्टेंबरला निवडणूक आयोगाचे अधिकारी मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. येत्या गुरुवारी 26 सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीहून मुंबईत येतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 27 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक होईल. यानंतर त्याच दिवशी दुपारी 1 वाजता सीईओ, नोडल अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. यापाठोपाठ दुपारी 3 वाजता निमलष्करी दलाचे अधिकारी, आयकर विभाग, गुप्तचर यंत्रणा, सीबीआय, ईडी अधिकाऱ्यांबरोबर बैठक होईल.

तसेच शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांच्यासह प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी महत्त्वाच्या बैठका होतील. या सर्व बैठकींमध्ये राज्याची सध्याची परिस्थिती आणि विधानसभा निवडणूक याबद्दलचा आढावा घेतला जाईल.

कोणत्याही क्षणी जाहीर होणार निवडणूक
यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी किती पोषक वातावरण आहे, याबद्दलची माहिती जाणून घेईल. त्यानंतर शनिवारी 28 सप्टेंबरला सकाळी 9.30 वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांची बैठक होणार आहे. यानंतर दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाचे अधिकारी पत्रकार परिषद घेतील. या पत्रकार परिषेदनंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीकडे रवाना होतील, अशी माहिती समोर आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेतल्यानतंर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाईल, असं बोललं जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणूक जाहीर होऊ शकते, अशीही चर्चा सध्या रंगली आहे.

ऑक्टोबरपासून राज्यात आचारसंहिता?
विशेष म्हणजे येत्या ॲाक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राबरोबर झारखंड विधानसभेची निवडणूक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा कधी होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here