मोठी अपडेट, अजित पवार यांची विधानसभेत नीटबाबत घोषणा

0
7

नीट परीक्षेतील घोटाळ्यावरून देशभरात सध्या गदारोल सुरू आहे. लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य पणाल लागले असून याच मुद्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. दरम्यान याच मुद्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महत्वाची घोषणा केली. “वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाच्या ‘नीट’ परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची केंद्र आणि राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून वेगवेगळ्या यंत्रणांकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. दोषींना अटक करण्यात आली आहे. भविष्यात असे गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश जारी केला आहे. त्याद्वारे दोषींवर कठोर कारवाईसह मोठ्या आर्थिक दंडाची तरतूद केली आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेची जबाबदारी पूर्वीप्रमाणे राज्यांकडे सोपविण्याचा विचारही पुढे आला. केंद्र सरकार त्यासंदर्भात तपासणी करुन निर्णय घेणार आहे. दिवसरात्र अभ्यास करुन प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासन बांधिल असून यासंदर्भात विरोधी पक्षांनी सूचविलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार केला जाईल,” अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर, माजी अध्यक्ष नाना पटोले आदी सदस्यांनी विधानसभेत ‘नीट’ परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराचा मुद्दा स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केला होता. मात्र, अध्यक्षांनी स्थगन फेटाळल्यानंतरही सभागृहात यासंदर्भात माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘नीट’ परीक्षेत पेपरफुटी झाल्याचे प्रकार देशभरात घडले आहेत. बोगस विद्यार्थ्यांकडून पेपर लिहिण्यात आले आहेत. परीक्षेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचेही समोर आले आहे. असे प्रकार घडू नयेत, अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्नशील आहे. दोषींना कठोर शिक्षा आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक दंडाची तरतूद असलेला अध्यादेश केंद्र सरकारने जारी केला आहे. भविष्यात ही परीक्षा राज्यपातळीवर घेण्याचा प्रस्तावही तपासण्यात येत आहे. ‘नीट’ परीक्षा पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त व्हावी ही लाखो विद्यार्थ्यांसह, विरोधी पक्ष आणि राज्य सरकारचीही भूमिका आहे. त्यासंदर्भात विरोधी आणि सत्ताधारी पक्षांनी केलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करु, असे आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले.

नीटच्या झोल बाबत सरकारने भूमीका स्पष्ट करावी, विजय वडेट्टीवार यांची मागणी

दरम्यान नीटच्या झोल बाबत सरकारने भूमीका स्पष्ट करावी अशी मागणी करत सरकार जबाबदारी घेणार आहे की नाही ? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला. ‘ नीट परीक्षेत झोल सुरू आहे. या परीक्षेला महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यार्थी बसतात. एवढा मोठा घोटाळा होऊन सरकारची भूमिका स्पष्ट नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शिक्षण मंत्री म्हणतात काही गडबड झाली आहे. मग सरकार जबाबदारी घेणार आहे की नाही’ असा सवाल करत आज विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नीट परीक्षेवरून सरकारला विभानसभेत धारेवर धरले.

श्री.वडेट्टीवार म्हणाले, 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाले. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. राज्यात मोर्चे निघत आहेत. नांदेड मध्ये 15 हजार विद्यार्थी रस्त्यावर आले होते. त्यामुळे सरकारने या परीक्षेबाबत भूमिका स्पष्ट करावी. उद्या बोगस डॉक्टर झाले तर लोकांच्या आरोग्याशी खेळ होईल. राज्यात काही लोकांना अटक झाली आहे याची देखील माहिती सरकारने द्यावी, असे श्री. वडेट्टीवार म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here