CBI तपासातून मोठा खुलासा, NET परीक्षेचा पेपर फुटलाच, डार्कनेटवर अपलोडही झाला…

0
9

माणदेश एक्सप्रेस न्युज : नवी दिल्ली : युजीसी नेट परीक्षेच्या पेपरफुटीवरुन मोठा वाद निर्माण झालेली एनटीए मार्फत घेण्यात येणारी युजीसी-नेट (UGC-NET) परीक्षा रद्द करण्यात आली आहे. युजीसी नेट परीक्षेच्या पेपरफुटीवरुन मोठा वाद निर्माण झाल्याने, गृहमंत्रालयाने शिक्षण विभागाला युजीटी नेट परिक्षेच्या परीक्षेत घोटाळा झाल्याचे सांगितले. त्यानंतर, शिक्षण मंत्रालयाने संबंधित नेट परीक्षेचा पेपर रद्द केला आहे. याप्रकरणी तपास करत असलेल्या सीबीआयच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. युजीसीट नेट परीक्षेचा पेपर लीक झाला होता, परीक्षेच्या एक दिवस अगोदर हा पेपर लीक होऊन डार्कनेटवर टाकण्यात आला होता, असेही सीबीआयने (CBI) म्हटलं आहे.

 

केंद्र सरकारने युजीसी नेटचा पेपर रद्द केल्यानंतर या पेपरफुटीप्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. त्यामुळे, युजीसी नेटचा पेपर नेमकं कसा लीक झाला, लीक झाला की नाही, या अनुषंगाने तपास केला जात आहे. सीबीआयच्या प्राथमिक तपासात नेट परीक्षेचा पेपर 17 जून रोजी लीक झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पेपर लीक झाल्यानंतर तो एंक्रिप्टेड सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकण्यात आला. त्यानंतर, आपली चोरी उघडकीस येऊ नये म्हणून हा पेपर डार्कनेटवर टाकण्यात आला होता. सीबीआयच्या प्राथमिक तपासात या गोष्टी समोर आल्यानंतर, आता सीबीआयकडून अधिक तपास सुरू आहे. त्यासाठी, एनटीए आणि इतर एजन्सींकडून माहिती घेतली जात आहे.

युजीसी-नेट परीक्षेचा पेपर बुधवारी 19 जून रोजी रद्द केल्याचे जाहीर केले. त्यानंतर, याप्रकरणाचा तपास तत्काळ सीबीआयकडे देण्यात आला. विशेष म्हणजे 18 तारखेला म्हणजे पेपर रद्द होण्याच्या एक दिवस अगोदरच 9 लाख विद्यार्थ्यांनी नेट परीक्षेचा पेपर दिला होता. नेट परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर चोहोबाजुंनी टीका होऊ लागली. त्यामुळे, याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही प्रधान यांनी स्पष्ट केले.

 

नेट परीक्षा कशासाठी घेतली जाते

युजीसी नेट परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण उमेदवारांना महाविद्यालयात प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ज्युनिअर रिसर्च फेलोशीपमध्ये नियुक्ती मिळते. तर, देशातील विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये पीएचडीसाठी प्रवेश मिळू शकतो. दरवर्षी लाखोंच्या संख्येने नेट एक्झामसाठी विद्यार्थी परीक्षेला बसतात.