जगातील सर्वात उंच रेल्वे पूलावर धावली ट्रेन, जम्मूमधील हा VIDEO एकदा पाहाच

0
18

माणदेश एक्सप्रेस न्युज : नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब ब्रीजचं काम पूर्ण झालं आहे. या सर्वात उंच रेल्वे ब्रीजवरून पहिली ट्रेन चालवण्यात आली आहे. रामबन जिल्ह्यातील संगलदान आणि रियासी दरम्यान ट्रायल ट्रेन चालवण्यात आली आहे. आठ कोच असलेल्या ट्रेनची ट्रायल यशस्वीरित्या पार पडली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

भारतीय रेल्वेने चिनाब पुलावरुन आठ डब्यांच्या मेमू ट्रेनची चाचणी घेतली. मेमू ट्रेनने रामबन जिल्ह्यातील सांगलदान आणि रियासी दरम्यान सुमारे 46 किमी अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं. यावेळी ट्रेनचा वेग ताशी 40 किमी होता. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन सांगलदान येथून 12:35 वाजता निघाली आणि 14:05 वाजता रियासीला पोहोचली. यावेळी, ट्रेन 9 बोगद्यांमधून गेली, ज्यांची एकूण लांबी 40.787 किमी आहे. यासोबतच सर्वात लांब बोगदा T-44 11.13 किमी लांबीचा होता. ट्रेनने दुग्गा आणि बक्कल स्थानकांदरम्यान चिनाब नदीवरील रेल्वे पूल यशस्वीरित्या ओलांडला, जो जगातील सर्वात उंच कमान असलेला रेल्वे पूल आहे. रियासी, बक्कल, दुग्गा आणि सावलकोट स्थानके जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात आहेत. या विभागावर विद्युतीकरणाचे कामही करण्यात आलं आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील कौरी गावाजवळ सलाल धरणाच्या वरच्या बाजूला चिनाब नदीवर हा रेल्वे पूल बांधण्यात आला आहे. हा ब्रिज पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच असून जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे.

 

जगातील सर्वात उंच रेल्वे पूलावर धावलेल्या ट्रेनचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा.