लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंवर पलटवार म्हणाले, “भुजबळांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा तू कोण?”

0
8

माणदेश एक्सप्रेस न्युज : जालना :  मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना, ओबीसी आंदोलन करणारे आमचे विरोधकच नाहीत. तो येवलावाला काड्या करत आहे. हाकेंना भुजबळांनीच उभे केले आहे. तुमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केले तर नाव बदलेन, असा इशारा त्यांनी भुजबळांना दिला होता. यावरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

लक्ष्मण हाके म्हणाले की, आज मराठे एक नाहीत, संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हापासून मराठे एकत्र आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी हा महाराष्ट्र मराठी माणसाचा होणार असे सांगितले होते. हे कळण्या एवढी जरांगे यांची उंची नाही. जरांगे आणि त्यांचे सल्लागार कायम शरद पवार यांचा विरोध करत आलेत. जरांगे तुम्हाला आरक्षणातले शून्य नॉलेज आहे. तुमची माझ्या समोर बोलायची लायकी नाही. त्याला शिक्षण द्या पहिले, अशी टीका त्यांनी मनोज जरांगेंवर केली आहे.

भुजबळांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा तू कोण?

तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं तर नाव बदलेन, असा इशारा मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना दिला. यावर लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, भुजबळांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायला जनता तयार आहे ना, तू कोण राजकीय कारकीर्द उध्वस्त करणारा? असा खरपूस समाचार त्यांनी एकेरी उल्लेख करत मनोज जरांगेंचा केला. भुजबळ साहेब असतील, लक्ष्मण हाके असेल, प्रकाश शेंडगे असतील, महादेव जानकर असतील, गोपीचंद पडळकर असतील, मुंडे बहिण-भाऊ असतील, वडेट्टीवार असतील, ही माणसं या महाराष्ट्रातल्या जाती-उपजातींसह 492 जातींची भाषा बोलतात आणि जरांगे तुम्ही फक्त एका जातीची भाषा बोलताय, मग नक्की जातीय वादी कोण? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, गेली सात-आठ महिने आम्ही शांत बसलो. जरांगे तुम्ही बीड शहर जाळलं. टार्गेट करून ओबीसी नेते बदनाम केले. या देशात आणि लोकशाहीमध्ये मोठमोठ्या लोकांची इथल्या जनतेने जिरवलेली आहे. त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी यांचा देखील पराभव झालेला आहे. लक्ष्मण हाके प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद करायला तयार आहे, असेही त्यांनी म्हटले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here