कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका? ‘या’ चार मतदासंघात उमेदवार जाहीर

0
597

 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावापावरून तसेच गेल्या पाच वर्षांपासून बदललेल्या राजकीय संदर्भांमुळे चांगलीच रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांमधील पक्षांमध्ये उमेदवारीवरून संघर्ष अटळ असल्याची चिन्हे आहेत. कोल्हापूरमध्ये मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीमधील सहयोगी असलेल्या इचलकरंजीचे आमदार प्रकाश आघाडी आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांनी थेट चार मतदासंघात उमेदवार जाहीर करत महायुतीला धक्का दिला आहे.

शाहू विकास आघाडीला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता
जागावाटप होण्यापूर्वीच दोन्ही नेत्यांनी उमेदवार जाहीर केल्याने पन्हाळा शाहूवाडी, करवीर, इचलकरंजी, हातकणंगले मतदारसंघात महायुतीसमोर आव्हान निर्माण झाले आहे. दुसरीकडे, शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र, आता त्यांच्या शाहू विकास आघाडीला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे राजेंद्र पाटील आपल्याच पक्षाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या नेत्यांवर महायुतीची मदार होती त्यांनीच घेतलेल्या भूमिकेनं महायुतीला तगडा हादरा बसण्याची चिन्हे आहेत. कागलमधून हसन मुश्रीफ यांना कागल दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर समरजितसिंह घाटगे यांनी भाजपला सोडचिट्टी देत तुतारी फुंकली आहे. त्यामुळे कागलमध्ये सुद्धा महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा एकही लोकनियुक्त आमदार किंवा खासदार नाही. खासदार धनंजय महाडिक राज्यसभेवर आहेत. त्यामुळे जिल्हा भाजपचे नेतृत्व त्यांच्याकडेच आहे. आमदार प्रकाश आवाडे आणि विनय कोरे भाजपचे सहयोगी आमदार आहेत, तर राजेंद्र पाटील यड्रावकर शिंदे गटाचे सहयोगी आमदार आहेत. मात्र, आवाडे आणि कोरे यांनी स्वतंत्र भूमिका घेत महायुतीवर दबाव वाढवला आहे. कागलमध्ये सुद्धा धनंजय महाडिक युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे.

आवाडे आणि कोरेंकडून उमेदवार जाहीर
जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चार जागांवर दावा केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दोन ठिकाणी उमेदवार थेट जाहीर केले आहेत. ते स्वतः पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असतील, तर करवीरमधून त्यांनी संताजी घोरपडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे करवीरमध्ये शिवसेना शिंदे गटाची अडचण झाली आहे. करवीरची जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता असून या ठिकाणी चंद्रदीप नरके इच्छूक आहेत.

दुसरीकडे, इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असली, तरी त्यांनी आपल्या मुलाला ताराराणी आघाडीकडून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी हातकणंगलेमधून जयश्री कुरणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये टेन्शन वाढलं आहे. आपण कोणाकडेही उमेदवारी मागण्यासाठी जाणार नाही, असा पवित्रा प्रकाश आवाडे यांनी घेतला आहे.

राजेंद्र पाटील यड्रावकर स्वतंत्र भूमिका घेण्याची शक्यता
शिरोळमध्ये सुद्धा राजेंद्र पाटील यड्रावकर स्वतंत्र भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यांच्या शाहू विकास आघाडीला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे शिरोळमधून याच पक्षाच्या माध्यमातून विधानसभेच्या रिंगणात असतील असे चित्र आहे. हातकणंगले आणि इचलकरंजीमध्ये त्यांचा पक्ष नशीब आजमावू शकतो. त्यामुळे एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, हातकलंगले, शिरोळ, इचलकरंजी मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये वादाची चिन्हे आहेत. कागलमध्ये मुश्रीफांची उमेदवारी जाहीर झाल्यानंत समरजितसिंह घाटगे यांनी तुतारी फुंकली आहे.

चंदगड मतदारसंघांमध्ये सुद्धा महायुतीमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघावर अजित पवार गटाकडून दावा असला तरी यामध्ये भाजपकडून अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ अजितदादांकडेच राहिल्यास भाजपचे शिवाजीराव पाटील माघार घेणार का? याची स्पष्टता नाही.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here