आटपाडी : विभूतवाडी येथे वादळी वाऱ्याने झाड घरावर पडून एकाचा मृत्यू

0
55

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : वादळी वारे व पावसाने आज आटपाडी तालुक्याला झोडपून काढले. तालुक्यातील विभूतवाडी येथे वादळी वाऱ्याने झाड घरावर पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला . सदरची घटना आज दिनांक १६ रोजी सांयकाळी ६.३० च्या दरम्यान घडली.

आटपाडी तालुक्यात गेल्या आठवड्यापासून तापमानाने उच्चांकी पातळी गाठली होती. तापमान ४३ अंश सेल्सिअस पार गेल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. त्यातच हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला होता. आज सकाळ पासून आटपाडी तालुक्यात हवेत गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे सायंकाळच्या आसपास पावसाची येण्याची शक्यता होती.

सायंकाळी ६.०० पासूनचा वादळी वारे व पावसाला तालुक्यात सुरुवात झाली होती. पावसाचा जोर असला तरी, वादळी वारे देखील मोठ्या प्रमाणत वाहत होते. विभूतवाडी येथील हरिदास अर्जुन लाडे (वय ३५) रा. लाडेवस्ती ता. माण, जि. सातारा येथील असून ते विभूतवाडी येथील त्यांचे सासरे दत्तू मोटे यांच्या घरी आले होते. यावेळी वादळी वारे व पावसाला सुरुवात झाल्याने घरा पाठीमागील असणारे बाभळीचे झाड त्यांच्या घरावर पडले.

झाड घरावर पडले त्यावेळी घरामध्ये हरिदास लाडे, त्यांच्या पत्नी प्रमिला लाडे, मुलगी त्यांची सासू गोकुळाबाई मोटे, सासरे दत्तू मोटे हे घरामध्ये होते. यामध्ये सासरे दत्तू मोटे व प्रमिला लाडे यांना गंभीर दु:खापत झाली. तर हरिदास लाडे यांचा जागीच मृत्यू झाला. सदरील घटना ही विभूतवाडी गावातील नागरिकांना समजताच त्यांनी त्याठिकाणी धाव घेत, जेसीबीच्या साह्याने झाड बाजूला केले. हरिदास लाडे हे आटपाडी येथील बालभवन निवासी संकुल या ठिकाणी कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई-वडील, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here