विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विशेष सत्र न्यायालयाचा दणका ; ‘त्या’ प्रकरणात ठोठावला दंड

0
82

माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. सुनावणीला गैरहजर राहिल्याने कोर्टाने त्यांना ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोरोना काळात वीज दरवाढीविरोधात भाजपने आंदोलन केले होते. त्यावेळी राहुल नार्वेकर यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण केली होती.

याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी राहुल नार्वेकर यांच्यासह भाजप नेते मंगलप्रभात लोढा तसेच इतर २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी सध्या विशेष न्यायालयाकडे सुरू असून साक्षीदारांची उलट तपासणी केली जात आहे.
दरम्यान, या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असताना देखील राहुल नार्वेकर हे कोर्टात हजर राहिले नाहीत. यावरून न्यायमूर्तींनी चांगलाच संताप व्यक्त केला. राहुल नार्वेकर सुनावणीसाठी का हजर राहिले नाहीत, असा सवाल कोर्टाने त्यांच्या वकिलांना केला.

पुढील सुनावणीला त्यांना हजर राहण्यास सांगा, असं सक्त आदेश देत कोर्टाने राहुल नार्वेकर यांना ३ हजार रुपयांचा दंडही ठोठावला. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी ८ जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर कोर्टाच्या आदेशाचे पालन करून सुनावणीला जाणार का? हेच पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here