‘आम्हाला अटक केलं तरी चालेल, पण मागे ..संजय राऊत यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

0
86

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राज्यात राजकारण तापलं आहे. विरोधकांनी यावरून राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी देखील मागितली. मात्र, तरीही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असून आज महाविकास आघाडीच्यावतीने मुंबईमध्ये सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे.

महाविकास आघाडीच्या या आंदोलनाला अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत सरकारला इशारा दिला आहे. “आम्हाला अटक केलं तरी चालेल पण आम्ही आंदोलन करणार, मागे हटणार नाहीत. देवेंद्र फडणवीसांना आम्हाला अटक करायची असेल तर करावी. महाराष्ट्राचे खलनायक देवेंद्र फडणवीसच आहेत”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.

संजय राऊत काय म्हणाले?
“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी बोलताना मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं की वाईटामधून चांगलं घडतं. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सरकारच्या भ्रष्ट्राचारामुळे कोसळला आणि तरीही मंत्री केसरकर म्हणतात वाईटातून चांगलं घडतं. अशा पद्धतीची त्यांची मनोवृत्ती आहे. खरं तर महायुती सरकारमध्ये आपआपल्या लोकांना कामं देण्याच्या स्पर्धेतून हा प्रकरा घडला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींनी माफी मागितली असेल. पण माफी मागून हा प्रश्न सुटणार नाही. आता महाराष्ट्राला जर त्यांच्या भावना मांडायच्या असतील तर तुम्ही थांबवू शकत नाहीत. लोकशाहीमध्ये आंदोलनाला परवानगी द्यावी लागते, जर तुम्ही परवानगी देणार नसाल तर ही तुमची दडपशाही आहे”, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.

“आम्ही फक्त सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असता तर तुमचा कडेलोट केला असता. आता महाविकास आघाडी आंदोलन करणार आहे, म्हणून भाजपाचे काही लोक आंदोलन करणार आहेत. मात्र, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेसाठी आंदोलन करत आहोत आणि भाजपा आमच्या विरोधात आंदोलन करत आहे. आमच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरीही शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी आंदोलन करणार आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.

…तर आम्हाला अटक करा
महाविकास आघाडीच्या आंदोलनाला अडवण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही आंदोलन करणार आहोत. मग आम्हाला अटक केली तरी चालेल. आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या थांबवण्याचा प्रकार सकाळपासून सुरु आहे. आज रेल्वेचा मेगा ब्लॉक मुद्दाम वाढवण्यात आला आहे. कारण आमचे कार्यकर्ते लोकलने या ठिकाणी येऊ नये. आमच्या आंदोलनाला सरकार एवढं का घाबरत आहे? पण या सर्वांचे सुत्रधार देवेंद्र फडणवीस आहेत. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. तरीही आंदोलन रोखण्याचा प्रयत्न होतोय. आम्हाला अटक केलं तरीही आम्ही मागे हटणार नाहीत. देवेंद्र फडणवीस तुम्ही आम्हाला अटक करा. तुम्हाला हेच करायचं आहे. महाराष्ट्राचे खलनायक देवेंद्र फडणवीसच आहेत”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here