
पावसाळी अधिवेशनादरम्यान बुधवारी मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीला तब्बल 23 आमदार गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या अनुपस्थितीमुळे मविआमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
गैरहजर आमदारांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचाही समावेश आहे. तसेच काँग्रेसचे सहा, ठाकरे गटाचे पाच आणि शरद पवार गटाचे पाच आमदार बैठकीला अनुपस्थित होते. ‘एबीपी माझा’च्या हाती या 16 आमदारांची नावे लागली असून, त्यामध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, रोहित पवार, अस्लम शेख, सुनील राऊत, विश्वजित कदम, विकास ठाकरे यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांनी अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, बैठक आधी 23 तारखेला ठरली होती, मात्र ती पुढे ढकलल्याने आपल्याला आधीच ठरवलेले कार्यक्रम रद्द करता आले नाहीत. तसेच विकास ठाकरे आणि सुनील राऊत यांनीही मतदारसंघातील कामांमुळे गैरहजर राहिल्याचे स्पष्ट केले. “बैठकीला आलो नाही म्हणजे आम्ही फुटलो असा अर्थ नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मात्र या सर्व घडामोडींवर उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत असे म्हणतो, पण आपण खरंच एकत्र आहोत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी पुढे सांगितले की, विधिमंडळात तसेच राज्यभरातील आंदोलन आणि कार्यक्रमांमध्ये मविआची एकी दिसणे आवश्यक आहे.
या घटनेमुळे आगामी काळात महाविकास आघाडीतील एकी आणि समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


