द्राक्ष बागायतदाराची १६ लाखांला फसवणूक, चौघांविरुद्ध फिर्याद दाखल

0
374

विटा : माहुली (ता. खानापूर) येथील द्राक्ष बागायतदार भरत दादासो सूर्यवंशी (वय ४८) यांना दुबई व आखाती देशात माल पाठवून चांगला दर मिळवून देतो, असे आमिष दाखवून द्राक्ष व्यापाऱ्यांनी १५ लाख ८७ हजार ६४८ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आला.

याप्रकरणी द्राक्ष व्यापारी सलीम सरदार सय्यद, अधिक विठ्ठल पवार, पशुपती रंगनाथ माळी व गंगाराम ऊर्फ मुकुंद सुखदेव चव्हाण या चार द्राक्ष व्यापाऱ्यांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

माहुली येथील द्राक्ष बागायतदार भरत सूर्यवंशी यांची सहा एकर द्राक्ष बाग आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये व्यापारी सलीम सय्यद, पशुपती माळी, अधिक पवार व मुकुंद चव्हाण हे सूर्यवंशी यांच्या द्राक्ष बागेत आले. त्यावेळी त्यांनी तुमचा द्राक्ष माल आखाती देशात पाठवून चांगला दर देतो, असे सांगितले.

 

सूर्यवंशी यांनी व्यापाऱ्यांना पर्पल काळा हा ७ हजार ५३४ किलो माल प्रत्येकी १२० रुपये किलो दराने व एसएसएन लांबडा हिरवा हा ११ हजार २४ किलो द्राक्ष माल ६२ रुपये प्रतिकिलो दराने व्यापाऱ्यांना दिला. त्याची एकूण रक्कम १५ लाख ८७ हजार ६४८ होती. २ ते २८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संशयितांनी सर्व माल बागेतून काढून घेतला.

 

मात्र, सूर्यवंशी यांना पैसे दिले नाहीत. तगादा लावल्यानंतर सलीम सय्यद याने ४ लाख रुपये व दुसरा ४ लाख ५४ हजार १६० रुपये असे दोन धनादेश सूर्यवंशी यांना दिले. त्यातील चार लाखांचा एक धनादेश बँकेतून परत आला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शेतकरी भरत सूर्यवंशी यांनी शनिवारी रात्री द्राक्ष व्यापारी सलीम सय्यद, अधिक पवार, पशुपती माळी व गंगाराम उर्फ मुकुंद चव्हाण या चार द्राक्ष व्यापाऱ्याविरुद्ध पैसे न देता माझी १५ लाख ८७ हजार ६४८ रुपयांची फसवणूक केल्याबद्दल विटा पोलिसांत फिर्याद दिली.