अलिकडच्या काळात विविध बँकांसह (Bank) पोस्ट ऑफिसने (Post Office) गुंतवणुकीच्या दृष्टीनं वेगवेगळ्या योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा गुंतवणुकदारांना चांगला फायदा होत आहे. आज आपण पोस्ट ऑफिसच्या महत्वाच्या आणि फायदा मिळवून देणाऱ्या तीन योजनांची माहिती पाहणार आहोत.
अडचणीच्या काळात फायदा
पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक विविध योजना चालवल्या जातात. यामध्ये काही लहान बचत योजना आहेत तर काही योजना सुरक्षा प्रदान करणाऱ्या आहेत. पोस्ट ऑफिसच्या अशाच काही सार्वजनिक सुरक्षा योजना आहेत, त्याचा गुंतवणुकदारांना अडचणीच्या काळात फायदा होतो. यामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजनांचा समावेश होतो. यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही मोठी निधी उभारु शकता.
पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana)
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही पोस्ट ऑफिसची महत्वाची योजना आहे. 18 ते 50 वर्षे वयोगटातील कोणताही व्यक्ती ही योजना सुरु करु शकतो. या योजनेच्या माध्यमातून, तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य पुरवते. या योजनेअंतर्गत, विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. जर एखाद्या व्यक्तीला सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला केवळ 436 रुपये भरुनही योजना खरेदी करता येते. महिन्याला फक्त 36 रुपये वाचवले तरी कोणताही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana)
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनचे देखील अनेक फायदे आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना देखील या योजनेचा सहज लाभ घेता येतो. 2015 मध्ये सुरू झालेली सुरक्षा विमा योजना अपघात झाल्यास 2 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण प्रदान करते. या योजनेसाठी वार्षिक प्रीमियम फक्त 20 रुपये भरावा लागतो. ही अशी रक्कम आहे जी गरीब वर्गातील लोकही सहज भरू शकतात. जर विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाला तर विम्याची रक्कम त्याच्या नॉमिनीला दिली जाते. जर पॉलिसीधारक अपंग झाला तर त्याला नियमानुसार 1 लाख रुपयांची मदत मिळते. या योजनेचा लाभ 18 वर्षे ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्तींना मिळू शकतो. त्यामुळं ही योजना फायद्याची आहे. लाभार्थीचे वय 70 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना संपुष्टात येईल.
अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana)
अटल पेन्शन योजना ही देखील गुंतवणुकीच्या दृष्टीनं एक महत्वाची योजना आहे. जर तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळासाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करायची असेल, तर तुम्ही सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (APY) गुंतवणूक करु शकता. भारत सरकारच्या या योजनेद्वारे मासिक 5,000 रुपयांपर्यंतचे पेन्शन मिळू शकते. मात्र, तुम्हाला किती पेन्शन मिळेल हे तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे. कोणताही भारतीय नागरिक जो करदाता नाही आणि ज्यांचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान आहे, ते सरकारच्या या योजनेत योगदान देऊ शकतात.