
माणदेश एक्स्प्रेस/मुंबई : सध्या विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. विकी कौशलने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचं चांगलंच कौतुक आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील प्रेक्षक ‘छावा’ सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये हाउसफुल्ल गर्दी करत आहेत. अशातच आज शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘छावा’ सिनेमा टॅक्स फ्री होणार का? याविषयी घोषणा दिली आहे.
‘छावा’ सिनेमा टॅक्स फ्री होणार का? याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मोठ्या प्रमाणात ही मागणी होतेय की हा सिनेमा टॅक्स फ्री करावा. पण मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की इतर राज्य जेव्हा एखादा सिनेमा टॅक्स फ्री करतात तेव्हा ते सिनेमाचा करमणूक कर माफ करत असतात. महाराष्ट्राने २०१७ सालीच हा निर्णय घेतला आहे.”
“महाराष्ट्रात करमणूक कर आपण नेहमीकरता रद्द केला आहे. त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर नाही. म्हणून अशाप्रकारची टॅक्स माफी देण्याकरता तो करच सध्या नाही आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रमोशनकरता याशिवाय छत्रपती शंभूराजेंचा इतिहास हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचण्याकरता आम्हाला अधिक काय चांगलं करता येईल, याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करु.”
“मला एका गोष्टीचा अतिशय आनंद आहे की, छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य, त्याची वीरता आणि त्यांची विद्वत्ता प्रचंड होती. पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी- परमप्रतापी एक ही शंभू राजा था, असं ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलं त्यांच्यावर अतिशय चांगला सिनेमा बनवण्यात आला आहे. मला अजून हा सिनेमा बघायचाय. पण ज्या लोकांनी हा सिनेमा बघितलाय. त्यांनी सांगितलं की, इतिहासाशी कोणतीही प्रतारणा न करता ऐतिहासिक असा हा सिनेमा आहे. त्याबद्दल पहिल्यांदा मी सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक आणि त्यात प्रमुख ज्यांनी भूमिका साकारली आहे ते विकी कौशल.. अशा सर्वांचं मी अभिनंदन करतो.”